You are currently viewing दोडामार्गच्या सुपुत्रीला कॅलिफोर्नियातील कंपनीकडून लाखाची शिष्यवृत्ती..

दोडामार्गच्या सुपुत्रीला कॅलिफोर्नियातील कंपनीकडून लाखाची शिष्यवृत्ती..

बांदा

भिकेकोनाळ (ता. दोडामार्ग) गावची सुपुत्री व पुण्यातील नामांकीत कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या श्रुती सुरेश गवस (वय १९) या विद्यार्थिनीला अमेरिकेतील अव्हेरी डेनिसन कॅलिफोर्निया या कंपनीने एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. या शिष्यवृत्तीसाठी संपुर्ण भारतातून पंधरा विद्यार्थ्यांची निवड केली जाते. श्रुती ही महाराष्ट्र राज्यातून निवड झालेली एकमेव विद्यार्थिनी आहे.
श्रुतीने ‘अनाथाश्रमातील लहान मुलांचे संगोपन आधुनिक शास्त्रीची जोड देऊन कसे करता येईल’ या विषयावर एक प्रकल्प बनवून महाविद्यालयाच्या वतीने तो सादर केला होता.
विषयातील गांभीर्य, सखोल अभ्यास व शास्त्राची जोड असलेल्या या प्रकल्पाची निवड कंपनीने केली. ४५ मिनिटांच्या मुलाखतीत ६ तज्ञांच्या समितीने श्रुतीची शिष्यवृत्तीसाठी निवड केली.
श्रुती भिकेकोनाळ गावचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते लाडोबा गवस यांची नात आहे. एवढ्या लहान वयात समाजातील अशा नाजूक विषयाची जाण व त्यांवर अतिशय मेहनत घेऊन बनवलेल्या प्रकल्पासाठी निवड झाल्याने तीचे सर्वच स्तरावर कौतुक होत आहे. शिष्यवृत्तीतून मिळालेल्या पैशातून एखाद्या अनाथ आश्रमासाठी असा प्रकल्प ऊभा करण्याचा मानस असल्याची भावना तीने व्यक्त केली आहे. मिळालेल्या शिष्यवृत्तीसाठी तिने आपले आई वडील, गवस कुटूंब, शिक्षक वर्ग व मित्र परिवाराचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा