वेळ येते तीच सदा अनुभव देऊनी जाते.
नको उगा ठेऊ तू मनावर दडपण कशाचं.
विचार डोक्यातील सतावतील क्षणोक्षणी,
मिटता डोळे दिसतो समोर अंधःकार मनी,
नसता आधार मनास भय वाटते फुकाचं,
नको उगा ठेऊ तू मनावर दडपण कशाचं.
साथ सोबतीला संगे वेळेवर येतील सारे,
दुःखाच्या मागून वाहतील सुखाचे वारे,
वाऱ्याला वाहण्या लागे निमित्त वादळाचं,
नको उगा ठेऊ तू मनावर दडपण कशाचं.
अंधारातूनच उजळती नवी वाट शोधते पहाट,
तृप्त करताना तृष्णा अकारण झिजतो रहाट,
दुसऱ्यांसाठी मिटताना सुख पुन्हा उमलण्याचं,
नको उगा ठेऊ तू मनावर दडपण कशाचं.
उघड्या डोळ्यांनी दिसे स्वच्छ ठेव विश्वास,
ऐकलेल्या गोष्टींनी उगाचच करतो दुःस्वास,
अविचारच असे कारण ते दुःखास उगाचं,
नको उगा ठेऊ तू मनावर दडपण कशाचं.
वेळ येते तीच सदा अनुभव देऊनी जाते,
नको उगा ठेऊ तू मनावर दडपण कशाचं..
{दिपी}✒️
©दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६