समुद्रातील त्या महाकाय जहाजाने उडवली सुरक्षा यंत्रणेची झोप
देवगड
देवगड समुद्रात गुरुवारी संशयास्पद एक महाकाय जहाज दाखल झाल्याने सुरक्षा यंत्रणेची झोप उडाली होती. या जहाजा बद्दल लोकांमधे अनेक तर्क वितर्क सुरू होते. मुसळधार पावसाच्या उपस्थितीत पवनचक्की समोरच हे जहाज उभे होते. यावेळी देवगड पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे व पोलिस कर्मचाऱ्यांनी संबंधित घटनेची प्रत्यक्ष रित्या जावून पाहणी करून जहाजबाबत माहिती घेतली. त्यावेळी मिळालेल्या माहितनुसार ते जहाज प्रवासी जहाज असल्याचे निष्पन्न झाले.
वर्ल्ड नावाच्या त्या जहाजात कोणीही प्रवासी नसून फक्त कर्मचारी वर्ग असल्याचे यावेळी स्पष्ट झाले आहे. जहाजाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ते जहाज तिकडे थांबले असून, त्यांनी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधला आहे. ती यंत्रणा जहाज दुरुस्त करून किंवा पर्यायी व्यवस्था करून जहाज घेऊन जाणार असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली. हे जहाज इंडोनेशिया या देशातून गुजरात येथे दुरुस्ती करिता जाणार असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.