You are currently viewing वेंगुर्ले-पाल गावात “मोबाईल नेटवर्क” गायब…

वेंगुर्ले-पाल गावात “मोबाईल नेटवर्क” गायब…

तात्काळ सुविधा उपलब्ध करा; ग्रामस्थांची लोकप्रतिनिधींसह संबंधित विभागाकडे मागणी…

वेंगुर्ले

तालुक्यातील पालगावात गेले दोन महिने मोबाईल नेटवर्क अभावी ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. तर कोरोना सारख्या महामारीच्या काळात ही समस्या उद्भवल्याने रुग्णांसह “ऑनलाईन” शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी व “वर्क फ्रॉम होम” करणाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. दरम्यान यापूर्वी याठिकाणी केवळ “व्हीआय” कंपनीचे नेटवर्क मिळत होते. मात्र ते अचानक गायब झाल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे गावातील नेटवर्कचा प्रश्न तात्काळ सोडवावा अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने येथील युवा सामाजिक कार्यकर्ते प्रदीप मुळीक यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाकडे केली आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले.

त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, पाल गावात १५ मे पासून मोबाईल नेटवर्कची समस्या निर्माण झाली आहे. यापूर्वी या ठिकाणी आयडिया व वोडाफोन आदी कंपन्यांचे नेटवर्क मिळत होते. मात्र सद्यस्थितीत ते पूर्णता गायब झाले आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासह कोरोना काळात “वर्क फ्रॉम होम” करणाऱ्यांवर व गावातील रुग्णांवर होत आहे. संबंधित गाव शहरापासून लांब असल्याने कोणी आजारी पडल्यास वाहन बोलविण्या करता सुद्धा नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे आतापर्यंत सात ते आठ जणांचा उशिरा उपचार मिळाल्याने मृत्यू झाला आहे. तरी याकडे गांभीर्याने लक्ष घालून स्थानिक लोकप्रतिनिधींनी या ठिकाणच्या नागरिकांची नेटवर्कची गैरसोय दूर करावी, तसेच संबंधित कंपन्यांनी सुद्धा आपली सेवा सुधारून सहकार्य करावे, अशी मागणी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा