आम. दीपक केसरकर यांच्याकडून भांडाफोड.
सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर भाजपा-सेना युतीच्या मंत्रिमंडळात मंत्री असताना एमटीडीसीच्या माध्यमातून झालेल्या कामांमध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचे संजू परब यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले होते. दीपक केसरकर यांनी त्यावर भाष्य करताना पत्रकार परिषदेत खोटे आरोप कराल तर संजू परब यांना इशारा देत राजकीय कारकीर्द संपविण्याचा इशारा दिला होता. हा वाद धुमसत असतानाच आमदार नितेश राणे हे संजू परब यांच्या मदतीस धावून आले आणि त्यांनी केसरकरांना पत्रकार परिषदेत ईडीची चौकशी लावण्याचा इशारा दिला. आम.राणेंच्या धमकीने संतापलेल्या केसरकरांनी आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.
आम.केसरकरांनी पत्रकार परिषद घेत संजू परब यांना पुन्हा एकदा रडारवर घेत मागील नगराध्यक्ष पोटनिवडणुकीच्या वेळी सावंतवाडी नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून संजू परब हे आपल्या सोबत सेना प्रवेश करायला तयार होते. कुडाळ येथील डॉ.बाणावलीकर यांच्या घरी मिटिंग झाली होती. त्याचे साक्षीदार स्वतः डॉ. बाणावलीकर आहेत, ज्यात *संजू परब यांनी सेना प्रवेशासाठी आपल्याकडे २ कोटी ७० लाख रुपये मागितले होते.* त्यापैकी ७० लाख रुपये प्रवेशाच्या आधी व उर्वरित रक्कम नंतर द्यावी अशी त्यांची मागणी असल्याचे केसरकरांनी सांगितले. यावर डॉ. बाणावलीकरांच्या समोरच आपण कोणाला पैसे देत नाही आणि स्वतःसाठी कोणाकडून पैसे घेतही नाही यावर संजू परब यांनी, “तुम्ही मंत्री होऊनही स्वच्छ चारित्र्याचे राहिलात याचा आपल्याला अभिमान आहे” असेही सांगितले असल्याचे दीपक केसरकरांनी स्पष्ट केलं.
पत्रकार परिषदेत पुढे बोलताना इतर नेत्यांची मालमत्ता वाढत असताना आपली मालमत्ता मागील विवरणापेक्षा आताच्या विवरणात कमी झाल्याचे सांगितले. जर भ्रष्टाचार करून पैसे घेतले असते तर आपल्यावर कोट्यावधीचे कर्ज असले नसते, असे सांगत नितेश राणे यांनी आपल्याला ईडीची चौकशी लावण्याची दिलेली धमकी बाबत बोलताना, नितेश राणेंनी जरूर चौकशी लावावी, आपण त्याला घाबरत नाही. नितेश राणेंच्या जन्माच्या आधीपासून गेल्या ५० वर्षांपूर्वी आपल्या घराण्याने गोव्यात जागा घेतलेली आहे, त्यामुळे आपण धमक्यांना घाबरत नसून यापूर्वी ज्याप्रकारे नाम.आदित्य ठाकरे यांच्याबाबत आपलं वक्तव्य मागे घेतलं तसंच याही वक्तव्याचा विचार करावा. अन्यथा संघर्ष हा होतोच. आपण नारायण राणे यांच्या विरुद्ध प्रथम बोललो नव्हतो, परंतु वेंगुर्ला बंदर उद्घाटनाच्या वेळी नारायण राणे यांनी आपल्याला धमकी दिल्यानंतर आपण त्यांच्याविरुद्ध राजकीय संघर्ष केला याचीही आठवण आम.दीपक केसरकर यांनी करून दिली.
आमदार केसरकर म्हणाले सावंतवाडीच्या जनतेने आपल्या कुटुंबावर प्रेम केलं, तेच प्रेम ते आपल्यालाही देत आहेत. आपण कधीही कोणाकडून पैसे घेत नाही, आपण कोणाला फोन केला असेल तर कोरोनासाठी एखादी मदत अथवा गोरगरिबांना धान्य वाटप यासाठी केला असेल, असे त्यांनी स्पष्ट करत संजू परब यांचे खरे रूप सावंतवाडीतील जनतेसमोर आणले. संजू परब यांनी गणपती वरील फुल उचलून आपल्या मुलांची शपथ घेतली होती, परंतु त्यांनी खासदार साहेबांना दिलेलं वचन देखील मोडल्याचे केसरकर म्हणाले. सावंतवाडी संस्थानची परंपरा आहे, आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, परंतु जर कोणी अंगावर आले तर शिंगावर घेतल्याशिवाय राहत नाही असा इशाराच केसरकरांनी दिला.