आ. वैभव नाईक यांच्या हस्ते शेतकरी कर्ज योजनेच्या २४ लाभार्थ्यांना स्वीकृती पत्रांचे वितरण
बँक ऑफ इंडियाच्या राष्ट्रीयकरणाच्या ५२ व्या वर्धापन दिनानिमित्त आज बँक ऑफ इंडियाच्या कणकवली शाखेत किसान मेळावा आयोजित करण्यात आला. त्या अंतर्गत बँकेच्या कणकवली, नांदगाव, सांगवे या शाखां द्वारा शेतकरी सहाय्यता कर्ज (kcc), कृषीवाहन, स्वयं सहाय्यता बचत गट, आणि शेतकरी सोनं तारण कर्ज योजनेमध्ये कर्ज मंजुरीची एकूण २५ लाखांची स्वीकृती पत्रे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते २४ लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली.
यावेळी आ. वैभव नाईक म्हणाले, शेतकऱ्यांसाठी शून्य टक्के व्याजाने कर्ज योजना, पीक विमा योजना सुरु आहेत मात्र आपले शेतकरी या योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहत आहेत. या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचली पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी १०० टक्के कर्जाची फेड करतात. त्यामुळे बँक ऑफ इंडियाने आमच्या शेतकऱ्यांवर विश्वास ठेवून त्यांना कर्ज, विमा योजनांचा लाभ मिळवून द्यावा.शेतकऱ्यांच्या हितासाठी बँक ऑफ इंडियाने घेतलेला किसान मेळावा कौतुकास्पद आहे.असे त्यांनी सांगितले.
यावेळी बँकेच्या अधिकाऱ्यांनी शेतकरी कर्ज आणि विमा योजनांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली.या किसान मेळाव्याला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
याप्रसंगी बँक ऑफ इंडियाचे अग्रणी जिल्हा प्रबंधक प्रदीप प्रामाणिक, अधिकारी युनियनचे अध्यक्ष नंदकुमार प्रभुदेसाई, कणकवली शाखेचे वरिष्ठ शाखा प्रबंधक हेमंत मीना, यांसह अन्य शाखांचे शाखा प्रबंधक, बँक कर्मचारी शेतकरी मित्र व ग्राहक उपस्थित होते.