पोलीस आणि नागरिकांमध्ये संवाद वाढावा यासाठी झाला ‘हा’ निर्णय!
पोलीस व नागरिकांमध्ये संवाद वाढावा यासाठी आज (शनिवार) गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत चर्चा होऊन निर्णय झाला. या निर्णयाबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्वतः पत्रकारपरिषदेत माहिती दिली.
गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले की, “पोलीस आणि नागरिकांमध्ये संवाद वाढावा यासाठी आज आयुक्तालयात यावर आमची चर्चा झाली आणि निर्णय झाला, की प्रत्येक पोलीस स्टेशनच्या प्रमुखांनी महिन्यातून एकदा जनता दरबार घेतला पाहिजे. या जनता दरबारामधून जनतेची जी काय कैफियत असेल ती ऐकून घेतली पाहिजे, ती सोडवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे आणि त्याचं उत्तर देखील दिलं पाहिजे. मी नागरिकांना असं आवाहन करेन की, पोलिसांकडून जनता दरबाराची जी तारीख जाहीर केली जाईल, त्या अगोदरच जर आपले अर्ज संबंधित पोलीस स्टेशनकडे पाठवले, तर त्याचा अधीच अभ्यास करता येईल व जनता दरबारच्या दिवशी त्यावर कदाचित उत्तरही देता येईल.”