संपादकीय…..
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात गेले दशकभर जे नाव सर्वांच्या तोंडात आहे ते म्हणजे सावंतवाडीचे सुपुत्र माजी राज्यमंत्री आणि सावंतवाडी वेंगुर्ला, दोडामार्ग मतदारसंघाचे विद्यमान आमदार दिपकभाई केसरकर. आपल्या शांत संयमी राजकारणाने नारायण राणे यांना टक्कर देत सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा मोठ्या दिमाखाने फडकत ठेवला ते म्हणजे दीपक केसरकर. खरंतर दीपक केसरकर हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला नेता. केसरकरांचे आजोबा हे सावंतवाडी संस्थानमधील नगरसेठ म्हणून ओळखले जायचे. राजवाड्यात त्यांच्यासाठी वेगळी खुर्ची असायची. दीपकभाईंची जिल्ह्यातील इतर नेत्यांशी तुलना केली असता जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी सत्ता आणि संधी साधत राजकारणात पैसे कमावणे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवत आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले. जिल्ह्याच्या विकासापेक्षा स्वतःचाच विकास साधला परंतु मुळातच श्रीमंतीत जन्माला आलेले केसरकर मात्र जिल्हा विकासाचा ध्यास घेऊन मागेच राहिले. त्यामुळे सत्तेच्या स्पर्धेत दुसऱ्यांदा मंत्रिपद त्यांना मिळाले नाही.
दीपक केसरकरांच्या कल्पक नेतृत्वाने मंत्रीपदाच्या काळात त्यांनी जिल्ह्यात आजवर आला नव्हता एवढा निधी आणला. अनेक विकासकामे मार्गी लावली. परंतु अधिकाऱ्यांवर वचक न ठेवल्याने बरीच कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. त्यामुळे केसरकरांवर जिल्ह्यात टीकाटिप्पणी झाली. परंतु जिल्हा विकासासाठी नवनवीन योजना आणण्याच्या धडपडीमुळे एक व्हिजन असलेला नेता म्हणून केसरकर यांची संपूर्ण राज्यात ओळख आहे. दीपक केसरकरांनी अनेकांना धूळ चारली हे जिल्ह्याच्या राजकारणात कायमचंच लक्षात राहील. जिल्ह्याच्या राजकारणात अनेकांनी त्यांना पाण्यात पाहिले, परंतु जनता मात्र कायम त्यांच्यासोबत राहिली हे त्यांच्या मागील निवडणुकीतील विरोधकांचा विरोध आणि पैसा यावर मिळालेल्या विजयातून दिसून येते.
आपल्या अभ्यासपूर्ण कामांमुळे नगराध्यक्ष असतानाच त्यांनी सावंतवाडीचा कायापालट केला होता. राज्यमंत्री असताना सावंतवाडी टर्मिनस, सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, संकेश्वर रेडी महामार्ग, आडाळी एमआयडीसी येथे कारखाने आणण्यासाठी त्यांनी सर्वोत्तम प्रयत्न केले. परंतु क्षेत्र कोणतेही असो, पुढे जाणाऱ्यांचे पाय ओढणारे असतातच, त्यामुळे श्रेयवाद आणि पाय ओढण्याचा राजकारण्यांच्या वृत्तीमुळे दीपक केसरकर जिल्ह्याच्या राजकारणापासून काहीसे अलिप्तच राहिलेले दिसून आले होते, परंतु नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद दिल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांना दीपक केसरकर यांची आठवण आली, वरिष्ठ पातळीवरून केसरकरांना जिल्ह्यात सक्रिय होण्यासंदर्भात सूचना आल्याने कदाचित केसरकर प्रसार माध्यमांशी संवाद साधत यापुढे आपण आक्रमक होणार आणि जिल्ह्याच्या विकासासाठी काम करताना जिल्ह्यातील कामचुकार अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन शाल श्रीफळ देत सत्कार करणार अशी तंबीच दिली. त्यामुळे येत्या काळात केसरकर मैदानात उतरलेले दिसतील अशी आशा सर्वानाच वाटत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात पुढे त्यांची भूमिका काय असेल हे पाहणे औत्सुक्याचेच ठरेल,परंतु आजपर्यंतचा दीपक केसरकर यांचा राजकीय प्रवास पाहता जिल्ह्याच्या राजकारणातील सर्वच पातळीवरील मान-सन्मान आणि निष्कलंक राजकारण यातील एक यशस्वी माणूस म्हणून जिल्ह्यातील जनता त्यांचे नाव अग्रक्रमाने घेईल यात तिळमात्र शंका नाही. सावंतवाडीचे सुपुत्र आणि सावंतवाडीच्या विकासाचे शिल्पकार माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार आपले सर्वांचे लाडके दिपकभाई केसरकर यांचा १८ जुलै हा जन्मदिवस….! *दिपकभाईंच्या वाढदिवसानिमित्त संवाद मिडियाकडून त्यांना आभाळभर शुभेच्छा…!!💐💐💐*