You are currently viewing जिल्ह्यात 20 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट कायम…

जिल्ह्यात 20 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट कायम…

जिल्ह्यात 10 जुलै पासून सतत मुसळधार पाऊस पडत असून 20 जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 20 जुलै पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गेले काही दिवस मुसळधार बरसणाऱ्या पावसाने मालवण तालुक्यातील मसुरे पंचक्रोशीत जनजीवन विस्कळीत झाले आहे. रमाई नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. मालवण बेळणे कणकवली मार्गावरील बागायत येथे पुराचे पाणी थेट बागायत तिठा येथील बाजारपेठे नजीक पोचले होते. वडाचापाट गोळवण मार्गावर वडाचापाट येथे तर पोईप धरणावर पाणी असल्याने हा मार्ग सुद्धा वाहतुकीस बंद झाला आहे. गड नदीला सुद्धा पूर आल्याने भगवंतगड कॉजवे पाण्याखाली गेला होता. तसेच पालयेवाडी येथे रस्त्यावर पाणी आल्याने बांदिवडेत पोहोचणारे रस्ते बंद झाले आहेत. नदीचे पाणी शेतीतून प्रवाहीत होऊन वाहत असल्याने भात शेती लावणी वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसाचा जोर रात्री पर्यंत कायम राहिल्यास मसुरेसह वेरळ, बागायत आदी भागातील शेतीचे नुकसान होणार आहे.

कुडाळ तालुक्यातील कर्ली नदी काठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. काल रात्री प्रशासनाने आंबेडकरनगर येथील पुरामुळे बाधित झालेल्या 6 कुटुंबातील 25 व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी नातेवाईकांच्या घरी स्थलांतरित केलं. कुडाळ पावशी येथील भंगसाळ पुलाजवळ रात्री साडे आठ वाजता मोजलेल्या पाणी पातळीनुसार कर्ली नदीची पातळी 9 मीटर इतकी होती. आता मात्र पाणी ओसरत आहे.

जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील भेडशी काजवेवर गाडीसह अडकलेल्या आंध्र प्रदेशातील पाच युवकांची भेडशीतील युवकांनी सुखरुप सुटका केली. गोवा येथुन आंध्रप्रदेश येथे परत असताना भेडशी काँजवेवर असलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने गाडीसह ते पाचजण अडकले होते. त्यातील प्रथम तिघेजण बाहेर पडले. तर अन्य दोघे गाडीत अडकून पडले होते. ही घटना समजताच भेडशीतील युवक घटनास्थळी दाखल झाले. पर्यायी मार्गाच्या बाजूने जात त्या काजवे जवळच्या रस्त्यावर असलेल्या कंबरभर पाण्यात उतरुन जात गाडीजवळ पोचले. गाडीतून दोघांना सुखरूप बाहेर काढले. काही काळाने पाणी कमी झाल्यावर ते वाहन सुरक्षित ठिकाणी आणून ठेवले.

जिल्ह्यात सतत मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यामुळे नद्यांना पाणी आले असून बरीच धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाचे काही दरवाजे खुले करण्यात आले होते. त्यामुळे मोठ्या नद्यांमध्ये सोडलेल्या पाण्याने नद्यांची धोक्याची पातळी ओलांडली आहे. सर्वाधिक पाऊस मालवण तालुक्यात पडत असल्याची नोंद झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा