– संदेश पारकर
हायवेच्या अर्धवट व निकृष्ट कामाबाबत काही महिन्यांपूर्वी शिवसैनिकांना घेऊन कणकवली उड्डाणपूलावर केलेले रास्तारोको आंदोलन योग्यच असल्याचे कालच्या घटनेनंतर सिद्ध झाले आहे. जोपर्यंत चौपदरीकरण अंतर्गत सर्व कामे दर्जेदार होत नाहीत तोपर्यंत उड्डाणपूलावरील वाहतूक सुरु करु नये अशी भूमिका आम्ही त्यावेळी घेतली होती. आम्ही घेतलेली भूमिका योग्यच असल्याचे कालच्या घटनेमुळे सिद्ध झाले आहे.
उड्डाण पुलाच्या निकृष्ट कामामुळे काल उड्डाण पुलावरील एका बाजूचा रस्ता खचल्याची घटना काल घडली. यामुळे हायवेच्या बोगस कामाचा पुरावाच मिळाला असुन कामाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. उड्डाण पुलाच्या कामाचा दर्जा तपासल्या शिवाय उड्डाण पुलावरून वाहतूक सूरु ठेवणे धोकादायक आहे. आमची प्रशासनाकडे मागणी आहे की हायवेच्या कामाचे सक्षम यंत्रणेकडून त्वरित स्ट्रक्चरल ऑडिट व्हावे.
यासोबतच कणकवली शहरात हायवे संदर्भात अजुन बरेच प्रश्न आणि समस्या प्रलंबित आहेत. आरओडब्लू, अनधिकृत बांधकाम, चुकीचे अंतर्गत रस्ते, चुकीचे स्टॉप असे बरेच प्रश्न अजुनही प्रलंबित आहेत. बऱ्याच ठिकाणी बिल्डरकडून अनधिकृत बांधकाम करुन लोकांची फसवणूक करुन विक्रीव्यवहार केले गेले आहेत. शहरात महत्वाच्या ठिकाणी चुकीचे अंतर्गत रस्ते देण्यात आल्याने रोजच वाहतुकीचा खोळंबा होत आहे.
सत्ता असो वा नसो शिवसेना सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी नेहमीच आक्रमक आणि अग्रेसर राहिली आहे. हायवेच्या कामाचे त्वरीत स्ट्रक्चरल ऑडिट न केल्यास तिव्र आंदोलन छेडून उड्डाणपूलावरील दोन्ही बाजूची वाहतूक कायमस्वरूपी बंद करण्यात येईल असा ईशारा प्रशासनाला देत आहे.