आ. नितेश राणे यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर यंत्रणा खडबडून जागी
वैभववाडी
करूळ घाटात खचलेल्या भागाच्या दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे. आमदार नितेश राणे यांनी पाहणी दौर्यात अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. बांधकामासाठी लागणारे साहित्य घटनास्थळी पोहोच झाले आहे.
सोमवारी सकाळी करूळ घाटातील मोरीचा भाग दरीत कोसळला. घाट मार्ग खचल्याने या मार्गावरील वाहतूक संबंधित प्रशासनाने 26 जुलै पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान आमदार नितेश राणे यांनी खचलेल्या भागाची मंगळवारी दुपारी पाहणी केली. व कामात हलगर्जीपणा करणार्या अधिकार्यांची घाटातच खरडपट्टी काढली. प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे ही आपत्ती ओढवली आहे. ही नैसर्गिक आपत्ती नसून याला जबाबदार प्रशासन आहे. असे खडे बोल आमदार राणे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले होते. घाट मार्गातील गटारे साफ केली असती. गटारातील माती, दगड वेळीच काढले असते, तर हे नुकसान झाले नसते असे त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. 26 जुलै पर्यंत बंद वगैरे काही नाही. तात्काळ काम सुरू करा. यंत्रणा उभी करुन युध्दपातळीवर काम हाती घ्या. कोणतेही कारण ऐकले जाणार नाही अशी तंबी त्यांनी अधिकाऱ्यांना दिली होती.
नितेश राणे यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर करूळ घाटात बुधवारी खडी, वाळू व इतर साहित्य पोहोच झाले आहे. तर गुरुवारपासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे. आठ ते दहा मजूर दरीत उतरून काम करत आहेत. मंगळवारपासून या मार्गावरील संपूर्ण वाहतूक फोंडा घाट व भुईबावडा घाट मार्गे वळविण्यात आली आहे. गेली तीन दिवस करुळ घाट मार्गावरून वाहतूक बंद असल्याने मार्ग सुना सुना झाला आहे.