मधुमेह असलेल्या लोकांसाठी साखरयुक्त आणि गोड पदार्थ धोकादायक ठरू शकतात. हे सर्वांनाच माहित आहे. यासंबंधी करण्यात आलेल्या नव्या संशोधनातील दाव्यानुसार शुगर मुळे किशोरवयीन, युवा आणि वयस्क लोकांमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका वाढत आहे. आतड्याचा व मलाशयाचा कॅन्सर एकाच वेळी होतो, याला “कोलोरेक्टल कॅन्सर” असे म्हटले जाते.
विशेषज्ञांच्या मते, गेल्या काही वर्षांमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरची बाधा होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. ‘मेडिकल जर्नल’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात शुगर ड्रिंक आणि कोलोरेक्टल कॅन्सरमध्ये असलेल्या संबंधावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
या संशोधनात सुमारे ९४,४६४ नर्सेसना सहभागी करून घेण्यात आले होते. त्यापैकी सुमारे ४१,२७२ नर्सेसच्या शारीरिक समस्यांचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. त्यांनी वयाच्या १३ ते १८ वर्षापर्यंतचे साखरयुक्त आणि गोड पदार्थांचे सेवनाचे रेकॉर्ड ठेवले होते. या गोड पदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची शुगर टी, सफरचंद, संत्री, द्राक्षे यांसारख्या गोड पदार्थांच्या ज्युसचाही समावेश होता.
संशोधनातील माहितीनुसार २४ वर्षाच्या फॉलोअप नंतर संशोधकांना सुमारे १०९ नर्सेसना कोलोरेक्टल कॅन्सरची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. ज्या महिला आठवड्यातून एकच ड्रिंक घेत होत्या, त्यांच्या तुलनेत आठवड्यात दोन किंवा अधिक वेळा साखरयुक्त घेणाऱ्या महिलांमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका दुप्पट वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.