दीपक केसरकरांना डावलून शिवसेना जिल्ह्यात बॅकफूटवर
संपादकीय…
माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची अखेर केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. आज झालेल्या शपथविधी सोहळ्यात त्यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. त्यांच्याकडे लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचा कारभार सोपविण्यात आला. नारायण राणे यांच्या शपथविधी नंतर संपूर्ण कोकणात त्यांच्या समर्थकांनी फटाके वाजवून पेढे वाटून एकच जल्लोष करत “नारायण राणे आगे बढो” अशा घोषणा दिल्या. भाजपाने कोकणात नारायण राणे यांना कॅबिनेट मंत्रिपद देत एका अर्थाने शिवसेनेला शह दिल्याचे बोलले जाते, तसेच आगामी निवडणुका आणि मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत पुढील रणनीती आखल्याचेही दिसून येत आहे.
नारायण राणेंना मंत्रिपद दिल्यामुळे कोकणात भाजपा पक्ष बळकट होणार असे चित्र आजच्या घडीला तरी दिसू लागले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्षाला मजबुती प्राप्त होऊन शिवसेनेला बॅकफूटवर जावं लागण्याची चिन्हे आहेत. एकीकडे भाजपाने कोकणात पक्ष मजबूत करण्यासाठी नारायण राणे यांच्यावर विश्वास ठेवत केंद्रीय मंत्रिपद देऊन शिवसेनेला शह दिला आहे, तर शिवसेनेने ज्या माणसाने २५ वर्षांची नारायण राणे यांची कोकणातील सत्ता संपुष्टात आणली होती, त्यांना पराभव चाखायला लावला होता त्या सावंतवाडीच्या माजी राज्यमंत्री दीपक केसरकरांना मंत्रिपदी डावलून रत्नागिरी जिल्ह्यातील पाहुणे पालकमंत्री जिल्ह्यावर लादून स्वतःच्याच पक्षाला जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव चाखण्यास भाग पाडले. शिवसेना नेतृत्वाच्या चुकीच्या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपोआपच शिवसेना बॅकफूटवर गेली आहे.
शिवसेना स्वतःच्या फाजील आत्मविश्वासात मग्न असताना भाजपा नेतृत्वाने डाव साधत जिल्ह्यात आणि कोकणात पक्ष बळकटिकडे लक्ष केंद्रित करत नारायण राणे यांच्या हाताना बळ दिले आहे. केसरकर यांच्या प्रवेशामुळे मरगळ असलेली सेना जिल्ह्यात बळकट झाली होती. केसरकरांकडून शिवसेनेला जास्त फायदा झाला नसेल आणि केसरकरांनी स्वतःचा देखील फायदा करून घेतला नसेल परंतु शिवसेनेचे कोकणातील दोन जिल्ह्यात मात्र प्राबल्य वाढविले होते, मतदारांना जागृत केले होते. पर्यायाने जिल्ह्यात मागे पडलेली शिवसेना एक नंबरचा पक्ष बनली होती.
मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात कोकणचा ढाण्या वाघ म्हणून ओळख असलेल्या नारायण राणेंना कॅबिनेट मंत्रिपदी संधी मिळाल्याने आगामी काळात भाजपा सरशी साधणार की सेना आपली पत राखणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सन्माननीय दिपकभाई केसरकर यांना मंत्रिपद नाकारून शिवसेनेने अगोदरच आपल्याच पायावर दगड पाडून घेतला आहे. राणे कुटुंबाच्या अरेरावीला भीख न घालता दिपकभाईनी कोकणात शिवसेनेचे प्राबल्य निर्वीवाद वाढवले होते तरीही त्यांना डावलण्यात आले.हे कोकणातील कोणालाही आवडलं नव्हतं.
पक्षाला आर्थिक रसद पुरवणे आणि उद्धव ठाकरेंना शीव्या देणे या गोष्टी लक्षात घेऊन राणेंना केंद्रात मंत्रीपद देण्यात आले असावे.
कोकणचा कोणी वाली नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.