मालवण
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तारात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांना स्थान देऊन सायंकाळी खास. राणेंनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राणेंचा बालेकिल्ला असलेल्या मालवणात भाजप कार्यकर्ते व राणे समर्थकांकडून मोठा जल्लोष करण्यात आला. “नारायण राणे आगे बढो… हम तुम्हारे साथ है… भारतीय जनता पार्टीचा विजय असो ! अशा घोषणा देत भाजप कार्यालय तसेच भरड नाका येथे फटाक्यांची आतषबाजी करत आणि पेढे वाटत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.
भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागणार हे निश्चित झाल्यानंतर आज दिवसभर मालवणातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. सायंकाळी खास. राणे यांचे संभाव्य मंत्र्यांच्या यादीत पहिले नाव प्रसिद्ध झाल्यानंतर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मालवण भाजप कार्यालयात गर्दी केली. यावेळी भाजप कार्यालयात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. सायंकाळी सहा वाजता शपथ विधी सुरू होऊन खास. राणे यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करत कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटले. तर त्यानंतर भरड नाका आणि देऊलवाडा येथेही फटाक्यांची जोरदार आतषबाजी करत घोषणा दिल्या.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहरअध्यक्ष दीपक पाटकर, तालुका सचिव महेश मांजरेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक गणेश कुशे, पूजा करलकर, विजय केनवडेकर, बाबा परब, बबलू राऊत, विक्रांत नाईक, बाळा भोगले, भाऊ सामंत, राजू आंबेरकर, आबा हडकर, शंकर वाघ, अभय कदम, प्रमोद करलकर, पंकज पेडणेकर, जॉमी ब्रिटो यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर म्हणाले, खास. नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले, हा सिंधुदुर्गसाठीच नाही तर संपूर्ण कोकणासाठी भाग्याचा दिवस आहे. विकास काय असतो हे कोकणवासीयांना राणेंनी दाखवून दिले आहे. त्यामुळे हा आनंदाचा क्षण आहे. सिंधुदुर्गला पुन्हा एकदा चांगले दिवस येतील. राणे जिल्हावासीयांचे दैवत आहेत. आता पुन्हा एकदा जिल्ह्याच्या विकासाचे दालन खुले होणार आहे. रखडलेले प्रकल्प मार्गी लागतील, असा विश्वासही धोंडी चिंदरकर यांनी व्यक्त केला.