‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी वयाच्या ९८ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतलाय. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. दिलीपकुमार यांच्या निधनाने बॉलिवूडसह जगभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. एक महान अभिनेता आपल्यातून गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दिलीप कुमार आज जरी आपल्यात नसतील तरी त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून, अभिनयाच्या माध्यमातून, गीतांच्या माध्यमातून ते नेहमी अजरामर राहतील.
दिलीप कुमार यांनी आज (बुधवारी) सकाळी ७.३० वाजता अखेरचा श्वास घेतला. श्वासोच्छवास घेण्यात अडथळा जाणवत असल्यानं त्यांना २९ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दिलीप कुमार यांचे कौटुंबिक मित्र फैजल फारुखी यांनी आज सकाळी त्यांच्या निधनाची माहिती दिली. या दरम्यान त्यांच्या निधनाच्या अनेक वेळा अफवा आल्या. परंतु प्रत्येक वेळी त्यांच्या पत्नी सायरा बानो या निधनाचे वृत्त फेटाळत त्यांची प्रकृती अगदी व्यवस्थित असल्याचे सांगत आजची सकाळ दिलीप कुमार यांच्या चाहत्यांसाठी आणि चित्रपटसृष्टीसाठी वाईट उगवली. आज सकाळी दिलीप कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला.