२०२१-२२ या वर्षासाठी रोटरी क्लब ऑफ कणकवलीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात कणकवली रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. विद्याधर तायशेटे यांची निवड करण्यात आली. डॉ. तायशेटे व नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवार, ११ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वा. हुंबरट येथील ‘हॉटेल सावली’ येथे आयोजित करण्यात आला आहे.
रोटरीतर्फे पुढील वर्षात आरोग्यविषयक, रक्तदान शिबीर वृक्षारोपण, विविध स्पर्धा घेण्यात येतील, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे यांनी दिली. येथील हॉटेल सावली येथे डॉ. तायशेटे बोलत होते.
यावेळी सचिव वर्षा बांदेकर, उपसचिव रवींद्र मुसळे, ऍड. राजेंद्र रावराणे, संतोष कांबळे, नितीन बांदेकर, ऍड. दीपक अंधारी, दीपक बेलवलकर, दादा कुडतरकर, महेंद्र मुरकर, मेघा गांगण, राजश्री रावराणे, संध्या पोरे, तृप्ती कांबळे, दिशा अंधारी आदी उपस्थित होते.
डॉ. तायशेटे म्हणाले, वर्षभरात वृक्षारोपण, कुपोषित मुलांसाठी प्रोटिन पावडर, वाटप, रक्तदान शिबीर, ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबीर, वृद्धाश्रमात आरोग्य तपासणी, धान्यवाटप, अंधबांधवांना पांढरी काठी वितरण व त्यांच्यासाठी विविध स्पर्धा, पाककला प्रशिक्षण वर्ग व स्पर्धा, ज्येष्ठांचे जिल्हास्तरीय संमेलन, मतिमंद मुलांना गरजेनुसार साहित्य पुरवठा, गायन वगैरे अनेक स्पर्धा, करियर गाईडन्स, वयात येणाऱ्या मुलींसाठी कळी उमलताना हा मार्गदर्शनपर कार्यक्रम तसेच कणकवलीतील सामाजिक संस्थांच्या समन्वयातून काही उपक्रम राबविण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. तायशेटे पुढे म्हणाले, रोटरीतर्फे महामार्गावर गड नदी आणि जानवली नदी या पुलांवर कायमस्वरुपी रोटरीचे व्हील उभारण्यात येणार आहे. आवश्यक त्या ठिकाणी जागा उपलब्ध झाल्यास स्वच्छतागृहे बांधणार आहोत. कणकवली शहरातील रस्त्यांच्या गतिरोधकांवर पांढरे पट्टेही मारण्यात येणार आहेत.
कणकवली येथील स्मशानभूमींची स्वच्छता व सुशोभिकरण मोहीमही राबविण्यात येणार आहे. कोरोना काळात अविरत वैद्यकीय सेवा देणाऱ्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, ओरोस जिल्हा रुग्णालयातील डॉ. श्याम पाटील, कणकवली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सी. एम. शिकलगार, डॉ. संतोष चौगुले, डॉ. प्रशांत कोलते, कणकवली रुग्णालयातील परिचारिका नयना मुसळे, रुग्णवाहिका चालक राजू चव्हाण यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर तौक्ते चक्रीवादळात उत्कृष्ट काम केलेले वीज वितरणचे कर्मचारी रविकांत सातवसे, यवलराव राऊत, स्मशानभूमीत कार्यरत न. पं. कर्मचारी राजेंद्र तांबे, धनंजय कदम, सचिन कदम, दयानंद तांबे, अजय तांबे, संदीप तांबे, प्रणय तांबे यांचाही सत्कार करण्यात येणार असल्याचे डॉ. तायशेटे यांनी सांगितले.