– सर्व प्रवाशांनी चाचणी करून घ्यावी – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी
सिंधुदुर्गनगरी
केरळ राज्यातील मूळ गावाहून सिंधुदुर्गनगरीत आज सकाळी परतलेल्या जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी आणि पती सबरीश पिल्लई यांनी कुडाळ रेल्वेस्थानकात कोरोनाची चाचणी आरोग्य पथकाकडून करून घेतली. जिल्ह्यात परतणाऱ्या सर्वच प्रवाश्यांनी भीती न बाळगता आपली कोरोना चाचणी करुन सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले.
जिल्हाधिकारी श्रीमती मंजुलक्ष्मी या केरळ येथील आपल्या मूळगावी गेल्या होत्या. आज सकाळी त्या नेत्रावती एक्सप्रेसने सहकुटुंब सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतल्या. परतल्यानंतर त्यांनी नियमाप्रमाणे कोरोनाची तपासणी करून घेतली आहे. तसेच कोल्हापूर येथील जी.एस.टी. भवनमध्ये उपायुक्त असलेले त्यांचे पती श्री पिल्लई यांचीही तपासणी करण्यात आली.
यावेळी त्यांनी आरोग्य विभागाकडून सुरू असलेल्या तपासणीच्या कामाचा आढावा घेऊन सुरू असलेल्या तपासणीबाबत समाधान व्यक्त करून पथकाच्या कामाचे कौतुकही केले.