काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आंबोली घाटातील मुख्य धबधब्याच्या स्टॉल असलेल्या ठिकाणी दोन भले मोठे दगड अचानक रस्त्यावर आले. परंतु सध्या पर्यटकांना बंदी असल्याने थोडक्यात दुर्घटना टळली. यापूर्वी दोन वेळा असा प्रकार घडला होता. एकदा प्रवाशांच्या कारमध्ये मागून दगड घुसला होता. त्यात महिला जखमी झाली होती. तर अन्य एक भला मोठा दगड रस्त्यावर आला होता.
आंबोलीत बुधवारी दुपारनंतर दमदार पावसाला प्रारंभ झाला. आतापर्यंत जवळपास ८० इंच पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी ५ ते ६ दिवस कडकडून ऊन पडल्याने या ठिकाणची जमीन वाढलेली होती. आता ती पूर्णत ओली झाल्याने आणि अशातच जोराचा पाऊस असल्याने दरडीच्या ठिकाणचे भलेमोठे दोन दगडाच्या खाली रस्त्यावर आली. हे दगड कोसळताना कडकड असा आवाज झाला. यावेळी सचिदानंद राऊळ आपले काम आटोपून सावंतवाडीत जात होते. त्यांच्या समोरच हा प्रकार घडला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दगड खाली कोसळले त्यावेळी कोणीही पर्यटक अथवा गाडी नव्हती. तसेच पर्यटन बंद असल्याने तेथील चहाचे स्टॉल ही बंद होते. त्यामुळे जीवितहानी थोडक्यात टळली.