You are currently viewing काथ्या कारखाना येथे १ जुलैला कृषि दिन

काथ्या कारखाना येथे १ जुलैला कृषि दिन

एम के गावडे व प्रज्ञा परब यांचे आयोजन

वेंगुर्ला

हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरी केली जाते. वेंगुर्ला कॅम्प येथील महिला काथ्या कारखाना येथे वसंतराव कृषी भूषण पुरस्कार प्राप्त एम के गावडे व जिजामाता कृषी भूषण प्रज्ञा परब यांच्यावतीने १ जुलै रोजी सकाळी ११ वाजता यावर्षी शासकीय नियमांचे पालन करून कृषी दिन साजरा करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा आहे. कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे वसंतराव नाईक यांनी लक्ष दिले. त्यावेळची मर्यादित साधने आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन राज्यात कृषीक्रांती घडवून आणली. शेतीला आधुनिक स्वरुप देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. राज्यात ‘कृषी विद्यापीठां’ची स्थापना केली. शेतकऱ्यांना संकरीत बियाणे उपलब्ध करुन अन्न-धान्याच्या दुष्काळावर मात केली. १९७२ च्या दुष्काळाचं संकट त्यांनी आव्हान म्हणून स्विकारलं आणि दुष्काळनिवारणाचा शाश्वत मार्ग दाखवला. राज्याच्या कृषीविकासाला योग्य दिशा दिली. ‘रोजगार हमी योजने’तून महाराष्ट्राच्या विकासाचा पाया मजबूत केला. ‘संकटाच्या काळात शासकीय मदतीचे धोरण लवचिक असले पाहिजे’ हा विचार त्यांनीच दिला. कृषीक्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस ‘कृषीदिन’ म्हणून साजरा करतो.

या कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी व फळ बागायती शेतकरी यांचा सत्कार करण्यात येणार असून बांधावरील आंबा,जांभूळ पिकांच्या लागवडीची माहिती तज्ञ मार्गदर्शकांच्या मार्फत देण्यात येणार असल्याची माहिती कृषिभूषण एम के गावडे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा