सावंतवाडी-शिरोडा रस्ता मंगळवारपासून दुचाकी, रिक्षासाठी होणार सुरू
सावंतवाडी
मळगाव घाटातील कोसळलेल्या मोरीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मंगळवारपासून दुचाकी व तीन आसनी रिक्षांसाठी हा मार्ग खुला होणार आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहे,अशी माहिती सार्वजनिक बांधकामचे उपकार्यकारी अभियंता अनिल आवटी यांनी दिली.
ऐन पावसाच्या तोंडावरच मळगाव घाटीतील मोरी खचल्यामुळे शिरोडा-सावंतवाडी हा राज्य मार्ग वाहतूकीसाठी धोकादायक झाला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये,म्हणून रस्ता बंद करून हे मोरी बांधण्याचा निर्णय प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी घेतला होता. दरम्यान रस्ता अचानक बंद झाल्याने तब्बल ११ किलोमीटरचा फेरा मारून निरवडे, मळगाव, न्हावेली, मळेवाड आदी भागातील लोकांना सावंतवाडीत यावे लागत आहे. त्यामुळे हे काम लवकरात-लवकर करण्यात यावे, तसेच किमान दुचाकी व रिक्षांसाठी एका बाजूने वाहतूक सुरू करावी,अशी मागणी होती. त्यानुसार युद्धपातळीवर काम सुरू असून मंगळवार पासून दुचाकी व तीन आसनी रिक्षासाठी वाहतूक सुरू होईल,अशी अपेक्षा श्रीआवटी यांनी व्यक्त केली आहे.