जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रातील आणखी एक टप्पा पूर्ण
सिंधुदुर्गनगरी
26 जानेवारी 2018 रोजी विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वेंगुर्ला येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन संपन्न झाले. त्यावेळी अवघ्या साडे तीन वर्षांमध्ये हे रुग्णालय पूर्ण होऊन रुग्णांच्या सेवेत दाखल होईल असे कोणास वाटले ही नसेल. पण, ते सत्यात उतरले आहे.
सुरुवातीस नगर परिषद वेंगुर्ला यांचा तिथे दवाखाना होता. त्यानंतर नगरपरिषदेने सदर इमारत व जागा शासनाकडे हस्तांतरीत केली. त्यामुळे वेंगुर्ला तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय जुलै 2000 साली सुरू झाले. याच जागेत 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याचा ध्यास तत्कालीन पालकमंत्री व विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी घेतला. त्याप्रमाणे वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यास शासनाने मान्यता दिली. शासनाने या रुग्णालय इमारतीच्या बांधकामासाठी 6 कोटी 69 लक्ष 4 हजार रुपयांचा निधी मंजूर केला. 26 जानेवारी 2018 रोजी भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. साडे तीन वर्षांमध्ये इमारत बांधकाम पूर्ण होऊन आज त्याचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे. आता हे रुग्णालय जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेत दाखल झाले आहे. वेंगुर्ला तालुक्यात शिरोडा हे 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय कार्यरत असून आता या तालुक्यात नव्याने एक 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय कार्यरत झाले आहे.
उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला येथे पुढील आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत. सद्या या रुग्णालयात क्ष-किरण यंत्र, रक्त चाचणी करिता ऑटोमेटीक सेल काऊंटर, सेमी ऑटो ॲनालायझर, मल्टीपॅरा मॉनीटर, पल्स ऑक्सीमीटर, सर्जिकल क्वाटरी, नवीन रुग्णवाहिका, 108 सेवा, ईसीजी मशिन या प्रकारच्या महत्वाच्या सुविधा उपलब्ध आहेत. स्पेशालीस्ट डॉक्टर्स – फिजिशियन, जनरल सर्जन, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, स्त्री रोग तज्ज्ञ असे तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध असणार आहेत. आंतररुग्ण विभाग – जनरल मेडीसीन , जनरल सर्जन, बालरुग्ण, स्त्री रोग व प्रसुती सेवा, रक्तासाठा या सुविधा मिळणार आहेत. केंद्र राष्ट्रीय आरोग्य अभियान – आयपीएचएस कार्यक्रमातून रुग्णालयीन कामकाजानुसार खाजगी डॉक्टरांची कंत्राटी पध्दीतीने नियुक्ती करण्यात येत आहे. तसेच जनरल सर्जरी व स्त्री रोग प्रसुती सेवेतील शस्त्रक्रियांसाठी हत्यारे, उपकरणे गंभीर रुग्णाला सेमी आयसीयु उपचार देणेसाठी उपकरणांची उपलब्धता आहे. आहार सेवा, वस्त्रधुलाई सेवा याचीही उपलब्धता असेल. मनुष्यबळ – उपजिल्हा रुग्णालयाकरिता गट अ ते ड पर्यंत 46 पदांचा आकृतीबंध असून त्यापैकी 25 पदे ग्रामीण रुग्णालयाची त्यामध्ये समाविष्ठ होतील. उपजिल्हा रुग्णालय स्थापन झाल्याने आता वेंगुर्ला तालुका मुख्यालयी ग्रामीण रुग्णालय कार्यरत न राहता उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला म्हणून कार्यरत राहणार आहे.
कोरोनाच्या या संकटसमयी जिल्हा आरोग्य विभागाने केलेल्या कार्याला तोड नाही. रुग्णसेवे सोबतच रुग्णांसाठीच्या सोयीसुविधा वाढवण्यावरही भर दिला जात आहे. यासाठी पालकमंत्री उदय सामंत हे नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. सुरुवातीस जिल्ह्यात डायलेसिसची सेवा उपलब्ध करुन देण्यात आली. कोविड प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये गरज लक्षात घेऊन ऑक्सीजन बेड्सची संख्या वाढवण्यात आली. व्हेंटिलेटर्स, ऑक्सीजन कॉन्सट्रेटर यांची संख्याही वाढवण्यात आली. अनेक ठिकाणी डीसीएचसीची स्थापना करण्यात आली. आता वेंगुर्ला येथे 50 खाटांचे सुसज्ज असे उपजिल्हा रुग्णालय कार्यरत झाले आहे. त्याचबरोबर 25 खाटांचे डीसीएचसीही सुरू करण्यात आले आहे.
एकूणच पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम तर होत आहेच, पण त्याचबरोबर रुग्णांचा चांगली सेवाही देण्यात येत आहे. हे रुग्णालय म्हणजे जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्राताली आणखी एक टप्पा पूर्ण झाल्याचेच द्योतक आहे.
याशिवाय भविष्यात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणखी सक्षम करण्यासाठी जिल्ह्यात लवकरच मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरु करण्यात येणार आहे. त्यामध्ये हृदयरोग, कर्करोग, युरॉलॉजी, डायलेसिस, न्युरॉलॉजी, अतिदक्षता विभाग अशा सुविधा उपलब्ध असणार आहेत. जिल्ह्यात आणखी 3 नविन उपजिल्हा रुग्णालये सुरू करण्यात येणार आहेत. त्यामध्ये देवगड, दोडामार्ग आणि मालवणचा समावेश आहे.
एकूणच संकटातही संधी कशी पहावी याचे उत्तम उदाहरण सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य यंत्रणेने पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यासमोर ठेवले आहे हे नक्की.