लवकरच ग्रामपातळीसह जिल्हास्तरिय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणार
कणकवली
देशाच्या कानाकोपर्यांत गेली २५ वर्षें कार्यरत असलेल्या आझाद हिंद संघटनेच्या आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या कोकण प्रदेश संघटक पदी येथील सामाजिक कार्यकर्ते, तसेच जेष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बुलढाणा येथील अँड. सतीशचंद्र रोठे पाटील, भिवंडी येथील प्रदेश अध्यक्ष प्रशांत यशवंत पाटील, तसेच कल्याण येथील प्रदेश संघटक विलास भागुजी कंक यांनी श्री चव्हाण यांची नियुक्ती केली आहे.
देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या क्रांतिकारी विचारांना प्रमाण मानून, मार्तुतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात २३ जानेवारी, १९९६ रोजी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अँड. सतीशचंद्र रोठे पाटील यांनी या संघटनेचे बीजारोपण केले. गेली २५ वर्षें आझाद हिंद या संघटनेची राष्ट्रमाता माँ जिजाऊसाहेब, छत्रपती शिवराय यांच्या स्वराज्य संकल्पनेतूनच संपूर्ण भारतभर वाटचाल सुरू आहे. माणसाने माणसाशी मानसासम वागणे ही संघटनेची खरी ओळख आहे. सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, मजूर यांच्या न्याय हक्कासाठी ही संघटना लढत आहे. आजपर्यंत भारतात एकाही संघटनेने केलेली नसतील एवढी आंदोलने आझाद हिंदच्या नावावर आहेत.
संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाचा, उत्थानाचा आणि प्रगतीचे मार्ग सांगणार्या सर्वं महापुरुषांच्या विचारांना क्रुतीप्रवण अभिवादन करण्याचा संघटनेचा प्रथम प्रयत्न आहे. राष्ट्रभक्ती, निस्वार्थ समाजसेवा, सर्वंधर्म समभाव आणि राजकारण विरहित या चार मूलभूत आधार स्तंभावर आझाद हिंदची पायाभरणी झालेली आहे.
आझाद हिंद संघटनेच्या अंतर्गत आझाद हिंद शेतकरी, कामगार, महिला, युवक, युवती, विद्यार्थी, साहित्यिक, तसेच आदिवासी, बहुजन संघर्ष समिती अशा वेगवेगळ्या उपसमित्या कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, साहित्यिक अशा प्रत्येक क्षेत्रात आझाद हिंदची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे सिध्द झाले आहे.