निकृष्ट काम करूनही ठेकेदाराला पाठीशी घातले
कणकवली
मुंबई गोवा महामार्ग ठिकठिकाणी खचला, काही ठिकाणी तडे गेले तर कुडाळमध्ये महामार्गाला धबधब्याचे स्वरूप आले. या सर्व निकृष्ट कामांना सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी भाजपचे लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. निकृष्ट काम असतानाही त्यांनी ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम केले असा आरोप मनसे नेते परशुराम उपरकर यांनी आज केला.
श्री.उपरकर यांनी आज ऑनलाईन पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, हायवेच्या निकृष्ट कामाबाबत आम्ही गेली तीन वर्षे सातत्याने आवाज उठवत आहोत. वेळोवेळी आपण महामार्गाचे काम कशा प्रकारे निकृष्ट झाले आहे?हे प्रशासनाला दाखवून दिले आहे. पण राज्यकर्ते हे नेहमीच ठेकेदाराची बाजू घेऊन त्याला काम करण्यास मदत करत होते. रस्त्याला खड्डे पडले, नांदगाव, कणकवलीत तडे गेले, भराव खचला गेला. तरीदेखील राज्यकर्ते ठेकेदारावर कोणताही कारवाई करत नाहीत. कणकवलीतील रामेश्वर प्लाझा याठिकाणी मागील तीन वर्षे पाणी भरत आहे. त्यासाठी चिखलफेक करत दिखावा करून एका आमदाराने स्टंटबाजी केल्याचाही आरोप त्यांनी केला.
श्री.उपरकर म्हणाले, कालच पावसात कुडाळ मधील हायवेवरून पाणी पडत असतानाचे व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावेळी कुडाळवासियांनी प्रत्यक्षात धबधब्याचा आनंद आपल्याला मिळाल्याबद्दल आमदार-खासदार पालकमंत्री यांचे आभार मानले आहेत. सत्ताधारी नेहमी ठेकेदारांची बाजू घेऊन बोलत आहेत. कारण टोलवसुली मध्ये आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे भले झाले पाहिजे यासाठी सत्ताधारी ठेकेदाराला गोंजारत आहेत. तसेच कणकवली शहरात झालेले ब्रिजचे काम व सर्व्हिस रोडचे काम हे निकृष्ट दर्जाचे असून त्याच्या संदर्भात कोणीच का बोलत नाही? असाही सवाल परशूराम उपरकर यांनी सत्ताधारी व विरोधकांना केला आहे.