काव्यप्रकार: मुक्तछंद
ग्रीष्माच्या उकाड्याने धरणी ही तापली.
तरसली पाण्यासाठी जमीन भेगाळली.
तापत्या उन्हाच्या चटक्याने काया ही घामेजली,
गुरे ढोरे व्याकुळ झाडांच्या छायेत बसली.
किती पहावी वाट टक लावून आभाळी,
आच्छादली ढगांनी अवकाशी चादर काळी.
ढग आदळती जोरात, विजा कडाडत राहती,
येता सर पावसाची सारी सृष्टी आनंदती.
झाडे वेली पाने फुले पावसात न्हाऊनी घेती,
नदी नाले सरोवर दुथडी भरुनी वाहती.
डोंगर कपारीतून तुषार दरीत झेपावती,
कुणी नद्यास मिळती कुणी झरे बनूनी वाहती.
पशु पक्षी आनंदाने डबक्यात न्हाती,
बालगोपाल अंगणी खेळ पावसात खेळती.
बळीराजा शेतात जोत बांधुनी नांगरती,
पोरं टोर बाया पेरण्या चिखलाने माखती.
सर येता पावसाची दिस सुखाचे हे येती,
जणू स्वर्गच धरणीवर उतरल्याचे भास होती..
(दिपी)
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६