चौदा दिवस उलटूनही अल्पवयीन मुलीचा तपास नाही
वैभववाडी :
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याच्या गुन्ह्यातील संशयिताचा तसेच ‘त्या’ अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. घटनेला १४ दिवस होऊनही या प्रकरणी पोलिसांच्या हाती विशेष काही लागलेली नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित मुलीचे नातेवाईकही चिंतित आहेत.
तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी रात्रीच्या सुमारास बेपत्ता झाली. तिला अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात केली. या तक्रारीनुसार पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास करताना पोलिसांनी पहिल्या दोन-तीन दिवसात माहिती प्राप्त केली. मात्र त्यानंतर पोलिस तपासाला उतरती कळा लागली. संशयीत व त्या अल्पवयीन मुलीच्या फोन रेकॉर्ड सह संशयिताचे नाव, त्याचा मूळ पत्ता, तो वापरत असलेली दुचाकी आदी माहिती मिळाल्याचे पोलिस सांगत आहे. संशयितांच्या नातेवाईकांशी संपर्क झाल्याचे पोलिस सांगत आहेत. असे असताना पोलिस संशयितापर्यंत का पोचले नाहीत? याबाबतही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
काही दिवसांपूर्वी पोलिसांना संशयिताचा ठावठिकाणाही लागला होता. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवली नसल्याचे पुढे येत आहे. संशयिताची सर्व माहिती पोलिसांकडे असताना गेले १४ दिवस पोलिस नेमकी कशाची वाट पाहत आहेत ? हे न उलगडणारे कोडे आहे. तर आपल्या मुलीचा लवकरात लवकर शोध घ्यावा. यासाठी मुलीचे नातेवाईक पोलीस ठाण्याच्या चकरा मारीत आहेत. आपली मुलगी सुखरूप ताब्यात मिळावी म्हणून मुलीचे नातेवाईक तिच्या परत येण्याची वाट पाहत आहे. वृध्द आई मुलीच्या वाटेकडे डोळे लावून बसली मी आहे.