छोट्या पद्यावरील ऐतिहासिक मालिकांना प्रेक्षकांची कायमच पसंती मिळताना दिसते. अशीच एक शूरवीरांच्या शौर्यांची गाथा स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्टार प्रवाहवर २६ जुलै पासून सुरु होणाऱ्या ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेची कमालीची उत्सुकता आहे. स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांची शौर्यगाथा या मालिकेच्या रुपात उलगडणार आहे.
विशेष म्हणजे या मालिकेतून अनेक लोकप्रिय कलाकार आपल्या दमदार अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यातच लोकप्रिय अभिनेते अजिंक्य देव पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत. या मालिकेत अजिंक्य देव बाजीप्रभू देशपांडे साकारणार आहेत. हे ऐतिहासिक पात्र साकारण्यासाठी ते खुपच उत्सुक आहेत.
या भूमिकेविषयी सांगताना अजिंक्य देव म्हणाले, ‘माझ्या करिअरची सुरुवातच सर्जा सिनेमातल्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेने झाली होती. त्यामुळे बाजीप्रभू साकारताना प्रचंड आनंद होत आहे. बाजीप्रभूंच्या शौर्याच्या कथा आपण ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत. पावनखिंडीमध्ये जीवाची बाजी लावत ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले. अश्या या शुरवीराची भूमिका साकारायला मिळणं हे माझ्यासाठी नवं आव्हान असणार आहे. ” असं ते म्हणाले.
स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती दशमी क्रिएशन्सची असून २६ जुलैपासून रात्री १० वाजता छत्रपती शिवरायांच्या शिलेदारांची ही गोष्ट भेटीला येणार आहे. या भव्यदिव्य मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखंड महाराष्ट्राचच नव्हे तर आपल्या देशाचं आराध्य दैवत. महाराजांवर अनेक कथा, कादंबऱ्या, नाटक, मालिका आणि चित्रपट निर्माण झाले आहेत. यातून छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा आपण पाहिली आहे. ती वर्णावी तेवढी थोडीच आहे. या महान राजाच्या सेवेत अनेक रत्न होती ज्यांनी महाराजांच्या शब्दासाठी आपल्या देव देश आणि धर्मापायी प्राणांची आहुती दिली. अश्या शिलेदारांची गोष्ट सांगणारी मालिका जय भवानी जय शिवाजी सादर करताना अभिमान वाटतो आहे.”