कोरोना संसर्गाची दुसरी लाट अनेक ठिकाणी ओसरत असतानाच शिर्डीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तेथे अवघ्या पाच महिन्यांच्या बालिकेला आधी कोरोना होऊन गेला आणि आता म्युकरमायकोसिसची बाधा झाली आहे. तिच्यावर लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान, इतक्या लहान मुलीला म्युकरमायकोसिस झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे.
कोपरगाव तालुक्यातील कोरके कुटुंब शिर्डीत वास्तव्यास आहे. त्यांची परिस्थिती सामान्य आहे. त्यांना दोन मुली आहेत. त्यातील धाकटी मुलगी पाच महिन्यांची आहे. मे महिन्यात २७ तारखेला या मुलीला जुलाब आणि उलट्यांचा त्रास होत होता. सुरुवातीला तिला कोपरगाव येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिला दाखल करून घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार उपचार सुरू झाले. मात्र, काही फरक पडत नव्हता. त्यामुळे तिला नाशिक येथे हलविण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. तेथे तिची करोना चाचणी करण्यात आली.ती निगेटिव्ह आली.
मात्र, रक्त तपासणी केली असता तिच्यामध्ये अँटीबॉडिज तयार झाल्याचे आढळून आले. त्यामुळे तिला लक्षणे विरहित करोना होऊन गेल्याचे निदान डॉक्टरांनी केले. त्यानुसार उपचार सुरू करण्यात आले. तरीही तिला फरक पडत नव्हता. नंतर तिचा चेहरा, डोळे आणि अंगावर सूज आल्याचे आढळून आले. ही म्युकरमायकोसिसची लक्षणे असल्याचे पाहून डॉक्टरांनी त्यानुसार उपचार करण्याचा सल्ला दिला.
मुलीच्या कुटुंबियांची परिस्थिती हलाकीची आहे. आतापर्यंत त्यांनी नातेवाईकांकडून पैसे घेऊन उपचारांचा खर्च भागविला. पैसे संपल्याने नाशिकमध्ये उपचार घेणे परवडणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी प्रवरानगर येथे प्रवरा ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयाने त्यांना सहकार्य केले. रविवारी १३ जूनला या मुलीला प्रवरा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. तेथे बालरोग विभागात डॉ. संजीव यांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू आहेत. आता या मुलीला अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. या रोगावरील उपचार महागडे आहेत. शिवाय इतक्या लहान वयातील रुग्ण समोर आल्याने प्रवरा रुग्णालयाच्या डॉक्टरांपुढेही हे आव्हान आहे.