दिवसेंदिवस वाळू माफियांची गुंडगिरी फोफावली आहे. पैशांच्या लोभापाई त्यांच्यातला माणूसकीचा लोप होऊन हैवानाने जन्म घेतलाय. त्यांना इतका माज आलाय की त्यांना पोलिसांची देखील भीती वाटत नाही. त्यांनी शुक्रवारी (११ जून) थेट पत्रकारावर जीवघेणा हल्ला केला. हातात लाठ्या-काठ्या घेऊन सात ते आठ जणांनी पत्रकाराला जीवघेणी मारहाण केली. विशेष म्हणजे जाफराबादेत भर रस्त्यात पंचायत समिती समोर वाळू माफियांनी पत्रकाराला मारहाण केली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. या हल्ल्याचा व्हिडीओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील मारहाणीवर अनेकांनी निषेध व्यक्त केला आहे.
जाफराबाद जवळून पूर्णा नदी वाहते. या नदीतून अवैध वाहतूक होत असल्याच्या बातम्या दैनिक ‘पुढारी’चे तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाबळे यांनी छापून आणल्या होत्या. याचा राग वाळू माफियांना होता. यातूनच वाळू माफियांनी हा हल्ला घडवून आणला. या हल्ल्यात पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर जालन्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेमुळे जाफराबाद तालुका हादरला आहे. तसेच सर्वसामान्य नागरिक आणि पत्रकार संघटनांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.
“ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर वाळू माफियांकडून भ्याड हल्ला झाला. जाफराबाद तालुका मराठी पत्रकार संघाकडून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. आम्ही या संदर्भात जाफराबाद पोलीस स्टेशन आणि तहसीलदारांना निवेदन दिले आहे. पाबळे यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्व पत्रकारांनी केली आहे”, अशी प्रतिक्रिया जाफराबाद तालुका मराठी पत्रकार संघाकडून देण्यात आली आहे.