You are currently viewing गेल्या १ तासापासून अक्षरशः मुंबईला पावसाने झोडपले

गेल्या १ तासापासून अक्षरशः मुंबईला पावसाने झोडपले

मुंबई :

आज सलग तिसऱ्या दिवशी मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या तासाभरापासून पावसाने अधिकच जोर धरल्याने मुंबईतील सखल भागात पाणी तुंबले आहे. पावसामुळे दादरचा रेल्वे रुळ पाण्यात गेला आहे. तर कुर्ला-सायन रेल्वे रुळावर मिठी नदीचं पाणी आले आहे. त्यामुळे रेल्वे रुळ जलमय झाला असून मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे मुंबईहून कसारा-कर्जतकडे जाणाऱ्या आणि कर्जत-कसाऱ्याहून मुंबईला येणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत.

काल दिवसभर रिमझिम कोसळणाऱ्या पावसाने संध्याकाळनंतर चांगलाच जोर धरला होता. त्यानंतर आजही सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या एक तासापासून पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढलं आहे. त्यामुळे हिंदमाता परिसरात गुडघाभर पाणी साचलं आहे. तर मिठी नदीच्या पाण्यामुळे सायन आणि कुर्ल्याचे ट्रॅक पाण्याखाली गेले आहेत. दादरचे रेल्वे रुळावरही पाणीच पाणी झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. चुनाभट्टीतही रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने हर्बर रेल्वेही अत्यंत धीम्यागतीने सुरू आहेत. त्यामुळे कामावर कामावर जाणाऱ्यांचे हाल होत आहे.

 

सकाळपासून मुंबईत धुँवाधार पावसाने सुरुवात केली. त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पावसाचे पाणी भरले. सायन पुलाखाली प्रचंड पाणी साचले आहे. तसेच सायनपासून ठाण्याकडे जाणारे रस्तेही पाण्याखाली गेले आहेत. सायन, दादर, कुर्ला, चुनाभट्टी, धारावी आणि चेंबूर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या ठिकाणी राहणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. अंधेरी फाटक आणि सबवेमध्ये पावसाचे पाणी भरले आहे. या भागात गुडघ्यापर्यंत पाणी आल्याने गाड्यांमध्येही पाणी शिरताना दिसत आहे. अंधेरी सबवेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पोलीस तैनात ठेवण्यात आले आहेत. तसेच बीकेसी कोविड सेंटर येथेही गुडघाभर पाणी साचले आहे. हा संपूर्ण परिसर जलमय झाल्याने नागरिकांना घाणेरड्या पाण्यातूनच लसीकरणासाठी जावं लागत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा