सावंतवाडी
शहरात आज उपनगराध्यक्षांच्या घराकडे जावून त्यांच्या पतीला झालेली मारहाण चुकीची आहे. पालिकेत सत्तांतर झाल्यानंतर शहरात राडे संस्कृती वाढली आहे.त्यामुळे नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षच जर सुरक्षित नसतील,तर सर्वसामान्यांचे काय?,असा सवाल करीत आजच्या प्रकाराची जबाबदारी स्विकारुन नगराध्यक्ष संजू परब यांनी राजीनामा द्यावा,अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राउळ यांनी आज येथे केली.दरम्यान आपण सावंतवाडीचा विकास करणार,असे सांगणारे आमदार नितेश राणे गेले कुठे? असा प्रश्न करुन त्यांनी
जो राजीनामा मागितला तो सावंतवाडीच्या परबांचाच होता का? असा खोचक सवालही श्री.राउळ यांनी उपस्थित केला.
शिवसेना पदाधिकार्यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी शहर अध्यक्ष बाबू कुडतरकर,माजी शहर अध्यक्ष शब्बीर मणीयार,माजी नगसेवक सुरेश भोगटे आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, येथील पालिकेत सत्तांतर झाल्यापासून शहरात दिवसेंदिवस गुंडगिरी राडेबाजी चे प्रकार वाढू लागले आहेत. या प्रवृत्तीवर अंकुश ठेवण्यापलीकडे सत्ताधारी त्यांना पाठीशी घालत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहेत.दरम्यान सौ.कोरगावकर यांच्या पतीला झालेल्या मारहाणीमागे नेमके गमक काय? असा सवाल करत, दिवसाढवळ्या असा प्रकार घडणे निंदनीय आहे. जर येथील नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचे काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दरम्यान हे सर्व प्रकार घडण्यास सत्ताधारीच जबाबदार आहेत. तेच त्यांना पाठीशी घालत आहेत, त्यामुळे नगराध्यक्षांनी आपला राजीनामा द्यावा, अन्यथा राणेंनी तो घ्यावा, असे म्हटले.