मारहाणप्रकरणी पाच युवकांवर गुन्हा दाखल : परस्परविरोधी तक्रार
सावंतवाडी
सावंतवाडीच्या उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या घरात प्रवेश करून त्यांचे पती व मुलांना मारहाण केल्याप्रकरणी शहरातील गौरेश दिलीप कामत व अतिक सामंत याच्यासह एकुण पाच जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कोरगावकर यांची मुलगी ऐश्वर्या दत्तप्रसाद कोरगावकर हिने सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला होता.
दरम्यान, ऐश्वर्या कोरगावकर हिने दिलेल्या तक्रारीमध्ये आमच्या कुटुंबियांचा कृषी सेवा केंद्र तसेच टेम्पो ट्रॅव्हलिंग रुग्णवाहिका आदींचा व्यवसाय आहे. आमच्या रुग्णवाहिका तसेच टेम्पो ट्रॅव्हल या नेहमी पालिकेच्या गार्डन समोरील मोकळ्या जागेमध्ये उभ्या केलेल्या असतात. आज पहाटे साडेसहा वाजता नगरपालिकेतून आपल्याला फोन आला की काहीजण गाड्या पार्क केल्यावरून त्याठिकाणी दंगा करत आहेत. त्यानंतर आई अन्नपूर्णा व पप्पा दत्तप्रसाद हे त्याठिकाणी दिले असता चौकशीअंती गौरेश कामत वगैरे माणसे असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्या घरी आल्या आई अन्नपूर्णा या शहरातील कृषी सेवा केंद्रामध्ये जाण्यास घराबाहेर पडली. तर वडीलही घराबाहेर होते आपण व भाऊ अखिलेश दोघे घरी असलेल्या कृषी सेवा केंद्रामध्ये होतो.यावेळी गौरेश कामत व अतीक सामंत असे मिळून एकूण पाच जण आपल्या चार चाकी गाडीतून उतरून घरामध्ये आले. यावेळी गौरेश कामत याने मालवणी भाषेमध्ये शिवीगाळ करायला सुरुवात केली. भाऊ अखिलेश याने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो शिविगाळ करत असतानाच त्या ठिकाणी वडील दत्तप्रसाद आले. त्यांनी गौरेश कामत यांना उद्देशून तुझे इथे काय काम अशी विचारणा केली असता गौरेश याने वडिलांना शिवीगाळ करून मारहाण करायला सुरुवात केली. हा प्रकार सुरू असताना त्याठिकाण अपनगराध्यक्षा अन्नपूर्णा आल्या. त्यांनीही त्याला विचारणा केली असता आम्ही कोणाला सोडणार नाही असे सांगून मारहाण करू लागला.तसेच आमच्या तक्रारी पोलीस ठाण्यामध्ये करायला लोक घाबरतात आमच्या नादाला कोण लागत नाही असे सांगून जीवे मारण्याची धमकी दिली.
ऐश्वर्या हिने दिलेल्या तक्रारीनुसार गौरेश कामन व त्याच्या अन्य अनोळखी मित्रांवर पोलीस ठाण्यांमध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गौरेश कामत यानेही आपल्याला दत्तप्रसाद व अखिलेश कोरगावकर यांनी मारहाण केल्याची परस्परविरोधी तक्रार पोलिसात दिली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पोलिसांच्या बघ्याच्या भूमिकेवर नगराध्यक्ष संजू परब यांचा संताप
सावंतवाडी उपनगराध्यक्षांचा घरात घुसून शुक्रवारी काही युवकांनी राडा केला. पोलिसांसमोरच त्यांनी उपनगराध्यक्षांच्या पतीला व मुलाला मारहाण केली. मात्र यावेळी उपस्थित पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली त्यामूळेच प्रकरण हातघाईवर पोहोचल असा आरोप नगराध्यक्ष संजू परब यांनी केला. या प्रकरणाची माहिती मिळताच नगराध्यक्ष परब यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी हा वाद सोडविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी पोलीस घटनास्थळी का नाहीत आधी असलेले पोलीस गेले कुठे असा संतप्त सवाल नगराध्यक्ष संजू परब यांनी केला. पोलिसांच्या बघ्याच्या भूमिकेमुळेच हे प्रकरण हातघाईवर गेल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.