लक्षणे दिसणाऱ्यांनी तत्काळ कोरोना टेस्ट करा, नागरिकांना लागेल ते सहकार्य देऊ…
मालवण
तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. अनेकांनी आपले नातेवाईक गमावले आहेत. त्यामुळे लक्षणे दिसणाऱ्या नागरिकांनी तत्काळ कोरोना टेस्ट करून वेळेत उपचार घ्या. लक्षणे अंगावर काढू नका, कोरोनाला हलक्यात घेऊ नका. असे भावनिक आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांनी तालुक्यातील नागरिकांना केले आहे.
दरम्यान ज्या रुग्णांना टेस्ट सेंटरला जाण्यात अडचणी असतील. विलगिकरण बाबत काही समस्या असतील, औषधोपचार बाबत काही मदत हवी असल्यास आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य केले जाईल. आपण स्वतःही अत्यावश्यक स्थितीत मदतीसाठी तत्पर आहोत. मात्र नागरिकांनी सहकार्य करावे असेही खोबरेकर यांनी स्पष्ट केले.
मालवणात सातत्याने वाढती रुग्णसंख्या पाहता बेडची संख्या अपुरी पडत आहे. मात्र कुंभारमाठ शासकीय कोविड सेंटर येथे अधिकचे ३० बेड आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून वाढवण्यात येत आहेत. ग्रामीण रुग्णालय येथे २० ऑक्सिजन बेड सुविधा दोन दिवसात सुरू होईल. अधिक आरोग्य सुविधा लागल्यास त्याही पुरवल्या जातील. मात्र वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणणे, कमी होणे गरजेचे आहे. प्रत्येकाने कोरोना खबरदारी नियमांचे पालन तंतोतंत करावे. लक्षणे दिसताच टेस्ट केल्यास लवकर उपचार झाल्यास रुग्ण बरे होण्यास अधिक मदत होते. मात्र निदान उशिरा झाल्यास गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. तरी नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.
कोरोना बाधित रुग्ण घरीच विलगिकरण असतील तर घरातील सर्व सदस्यांनी टेस्ट करून घ्यावी. विलगिकरण व्यक्तींनी आपला संपर्क इतर व्यक्तींशी येणार नाही याची प्राधान्याने दक्षता घ्यावी. १४ दिवस विलगिकरणाचा कालावधी पूर्ण करावा. या कालावधीत आरोग्याच्या बाबत काही समस्या जाणवल्यास तत्काळ संबंधित वैद्यकीय अधिकारी अथवा आपल्याशी संपर्क करावा. जनतेच्या सेवेसाठी आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून आम्ही तत्पर आहोत. असेही श्री. खोबरेकर यांनी सांगितले.