प्रेम मनातलं कधी
तिने नाही दाखवलं.
लपवून भाव मनी,
सारं काही चुकवलं.
खूप केला आटापिटा,
तिचं मन जाणण्याचा.
अर्थ नाही समजला
तिला माझ्या म्हणण्याचा.
मनातली दुःख तिच्या
हास्या आड लपतात.
हास्य दुःखावर दवा
जगी सारे बोलतात.
सारं काही तिने तिच्या
इच्छेविरुद्धच केलं.
काय म्हणतील लोक,
हेच मनी बिंबवलं.
कधी नव्हतीच तिची,
तक्रारच समाजाशी.
तिने केली होती सर्व,
तडजोड जीवनाशी.
(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी.