You are currently viewing सावंतवाडी रेल्वेस्थानकावर आरोग्य यंत्रणा सक्षम नाही.

सावंतवाडी रेल्वेस्थानकावर आरोग्य यंत्रणा सक्षम नाही.

जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक

संपादकीय…..

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढतच आहे, दरदिवशी सरासरी ५०० रुग्ण पॉझिटिव्ह भेटत असून मृत्युदर देखील सर्वाधिक आहे, त्यामुळे जिल्हा रेडझोन मध्ये गेलाय,जिल्ह्यातील लॉक डाऊन वाढण्याची स्थिती आहे. लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. जिल्ह्यातील परिस्थिती बिघडलेली असून देखील रेल्वे सुरू असल्याने दररोज मुंबई पुण्यातून अनेक चाकरमानी जिल्ह्यात दाखल होत आहेत. त्यामुळे रेल्वे आली की रेल्वेस्थानक गजबजलेली असतात.
रेल्वेस्थानकावर बाहेर पडण्याचा मार्गावर आरोग्य कर्मचारी प्रवाशांची तपासणी करतात. परंतु आरोग्य कर्मचाऱ्यांना हॅन्डग्लोज पुरवठा केलेला असूनही कर्मचाऱ्यांच्या हातात हॅन्डग्लोज नाहीत. रेल्वे आल्यावर उतरणारे मुंबईकर चाकरमानी सोशल डिस्टनसिंग न पाळता बाहेर पडण्यासाठी गर्दी करतात, चाकरमान्यांची बऱ्याचदा अरेरावी सुरू असते, आम्ही काय बाहेरचे आहोत का? गावतलेच आहोत वगैरे उत्तरे देत तपासणीमध्ये व्यत्यय आणला जातो. रेल्वे स्थानकावर अवघे दोनच पोलीस कर्मचारी असल्याने आणि प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडण्यासाठी अनेक चोरवाटा आहेत त्यामुळे काही चाकरमानी तपासणी न करताच चोरवाटांनी टेस्ट न करताच निघून जातात. त्यामुळे चोरवाटेने जाणारे हे संशयितच असतात आणि घरी गेल्यावर गावात कोरोना पसरवण्यासाठी ते कारणीभूत ठरतात.

संवाद मिडिया प्रतिनिधींनी आज रेल्वेस्थानक वर जाऊन आढावा घेतला असता तिथे असलेली आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्याचे आढळून आले. आरोग्य कर्मचारीच हातात हॅन्डग्लोज न घालता काम करत असतील स्वतःच काळजी घेत नसतील तर येणाऱ्या लोकांची ते कशी काय सुरक्षितता राखणार? असा प्रश्न उपस्थित होतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ब्लॅक फंगसचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. ब्लॅक फंगस म्हणजे म्युकरमायकोसिस हा साथीचा रोग घोषित केला असून तो जीवघेणा आहे. कोरोनापेक्षा त्याचा मृत्युदर अधिक असल्याने चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांची तपासणी अशाचप्रकारे बेभरवशी होत राहिल्यास जिल्ह्याचे आरोग्य व्हेंटिलेटरवर गेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे प्रशासनाने वेळीच सावध होऊन रेल्वेस्थानकांवर आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करावी.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्यात येतात, पत्रकार परिषदा घेऊन निघून जातात परंतु बोलण्यापेक्षा खरोखरच केलेल्या घोषणा पूर्णत्वास जातात की नाही हे मात्र पाहत नाहीत. गेले दोन महिने जिल्हा राज्यात कोरोना रुग्ण वाढ आणि मृत्यूदरामध्ये आघाडीवर असून देखील पालकमंत्री कुठेतरी कमी पडत असल्यानेच जिल्ह्यात आज गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ब्लॅक फंगस सदृश्य दोन रुग्ण आढळल्याने संकटात अजून भर पडण्याची चिन्हे आहेत. पालकमंत्र्यांनी पाहुण्यासारखे येऊन जाण्यापेक्षा पालक म्हणून जिल्ह्यात राहून जिल्ह्याची जबाबदारी सक्षमपणे पार पाडणे गरजेचे आहे. जिल्ह्यात वाढत असलेले कोरोना रुग्ण हे प्रशासनाच्या गलथान कारभाराचे अपयश आहे. महामारीच्या काळात आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यापेक्षा राजकीय पुढारी मात्र एकमेकांवर कुरघोडी करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे कोरोना महामारीचे कोणालाही सोयरसुतक नसून लोक मरत असतानाही राजकारणी मात्र राजकारणातच व्यस्त असल्याचे दिसत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, राजकारण्यांनी एकत्र येत जिल्ह्याला कोरोनामुक्त करावे अन्यथा भविष्यात जिल्हावासीय टाळू वरचे लोणी खाण्यासारखे राजकारण करणाऱ्या राजकारण्यांना राजकारण मुक्त करतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा