सावंतवाडी
सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा राष्ट्रसेवादलाचे अध्यक्ष समाजवादी विचारसरणीचे कार्यकर्ते चंद्रकांत बाबणी उर्फ अण्णा शिरोडकर (८९, रा. जूनाबाजार, सावंतवाडी ) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ व सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाजच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. तसेच दोन्ही संस्थांचे ते सेक्रेटरी होते. वैश्य समाज सावंतवाडीचे ते विद्यमान सेक्रेटरी होते. तसेच कै. भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचे माजी संचालक, सावंतवाडी तालुका व्यापारी संघाचे माजी सेक्रेटरी, वेगवेगळया सामाजिक संस्थेशी त्यांचे जिव्हाळयाचे संबंध होते.
त्यांच्या पश्चात तीन मुलगे, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी नगराध्यक्ष सौ. श्वेता शिरोडकर यांचे ते सासरे होते. माजी आमदार कै. जयानंद मठकर यांच्या घराण्याशी त्यांचे निकटचे संबंध होते. समाजवादी विचारसरणीचे कार्यकर्ते रमेश बोंद्रे, शशीकांत नेवगी, बाळासाहेब बोर्डेकर यांचे ते निकटचे सहकारी होते. त्यांच्या निधनामुळे समाजवादी चळवळीतील एक थोर मार्गदर्शक हरपला अशा शब्दांत त्यांना आदरांजली वाहण्यात आली.