कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा संपूर्ण देशात कहर पाहायला मिळत असतानाच दुसरीकडे ब्लॅक फंगसने थैमान घातले आहे. सध्या देशामध्ये म्युकोरमायकोसिसचे रुग्णात ही सातत्याने वाढत होत आहे. काही राज्यांनी तर वाढत्या रुग्णसंख्ये मुळे ब्लॅक फंगसला महामारी घोषित केले आहे. त्यामुळे आधीच कोरोनाच्या भीतीखाली वावरत असलेल्या लोकांची चिंता म्युकोरमायकोसिस मुळे अधिकच वाढली आहे. हा आजार पसरण्याची वेगवेगळी कारणे तज्ज्ञांकडून सांगितली जात आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ब्लॅक फंगस झालेल्या रुग्णांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यात २५ मे २०२१ रोजी रात्री ९.३० वाजेपर्यंतची आकेडवारी देण्यात आली आहे.
आतापर्यंत देशामध्ये एकूण ११ हजार ७१७ जणांना म्युकोरमायकोसिस लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण हे गुजरात आणि महाराष्ट्रामधील असल्याचं दिसून आलं आहे. ब्लॅक फंगसचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. गुजरातमध्ये २८५९, महाराष्ट्रात २७७०, आंध्र प्रदेशमध्ये ७८६, मध्य प्रदेश ७५२, तेलंगणा ७४४, उत्तर प्रदेश ७०१ आणि राजस्थानमध्ये ४९२ ब्लॅक फंगसच्या रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी ट्वीट करत ही आकडेवारी दिली आहे. कर्नाटकमध्ये ४८१, हरियाणात ४३६, तामिळनाडूत २३६, बिहारमध्ये २१५, पंजाबमध्ये १४१, उत्तराखंडमध्ये १२४, दिल्लीत ११९ आणि छत्तीसगडमध्ये १०३ रुग्ण आहेत. चंदीगडमध्ये ८३, तर गोव्यात १० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त अनेक राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात ब्लॅक फंगसचा एकही रुग्ण आढळलेला नाही. अंदमान निकोबार बेट, अरुणाचल प्रदेश, आसाम, लडाख, लक्षद्वीप, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्किममध्ये एकही रुग्ण नाही. तर पश्चिम बंगाल आणि दमन द्वीपची माहिती यात देण्यात आलेली नाही. आतापर्यंत १९ राज्यांनी म्युकोरमायकोसिस या आजाराला साथीचे आजार अधिनियमांतर्गत अधिसूचित घोषित केला आहे. या अंतर्गत सरकारी अधिकाऱ्यांना माहिती देणं बंधनकारक आहे.
आयसीएमआरने (ICMR) एका अभ्यासानुसार असा दावा केला आहे की, दुसऱ्या लाटेत रुग्णालयात दाखल झालेले जवळपास ३.६ टक्के रुग्ण सेकंडरी बॅक्टिरीयल आणि फंगल इन्फेक्शनग्रस्त आहेत. आयसीएमआरने हा अहवाल सोमवारी प्रकाशित केला. यामध्ये फंगल इन्फेक्शन संदर्भात महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमध्ये सेकंडरी बॅक्टिरीयल रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढून ५६.७ टक्के झाले आहे. तर रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांमध्ये हे प्रमाण १०.६टक्के आहे. दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा सेकंडरी बॅक्टिरीयलमुळे मृत्यूदर ७८.९ टक्क्यांपर्यंत वाढला होता. सर गंगा राम रुग्णालयाच्या सूक्ष्म जीव विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. चंद वट्टल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूदरामध्ये वाढ झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये स्टेरॉईडचा अती वापर केल्यामुळं या प्रकारचे रुग्ण वाढले आहेत असं म्हटलं आहे.