You are currently viewing मालवणात भाजप आमदारांच्या निधीतून होणार ३५ बेडचे कोविड सेंटर…नीलेश राणे

मालवणात भाजप आमदारांच्या निधीतून होणार ३५ बेडचे कोविड सेंटर…नीलेश राणे

वैद्यकीय अधीक्षकांना प्रस्ताव पाठविण्याची सूचना…

मालवण

सिंधुदुर्गात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे रुग्णांना बेड आणि ऑक्सिजन उपलब्ध होत नसतानाही शासन आणि सत्ताधारी गप्प आहेत. त्यामुळे येथील कोरोना रुग्णांची व्यवस्था होण्यासाठी भाजप विधानपरिषद आमदारांच्या निधीतून मालवण मध्ये ३५ बेडचे कोविड उपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते, माजी खासदार नीलेश राणे यांनी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांची ग्रामीण रुग्णालयात भेट घेऊन चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्याची सूचना त्यांनी केली.
दरम्यान कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतनमधील वसतिगृहाच्या एका इमारतीत हे सेंटर सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. बालाजी पाटील यांनी सांगितले.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड, आमदार नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळाने चार दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील वाढत्या कोविडच्या रुग्णांबाबत चिंता व्यक्त केली होती. यावेळी सिंधुदुर्गातील तिन्ही मतदार संघात भाजपच्या विधान परिषद आमदारांच्या निधीतून ३५ बेडचे कोविड सेंटर सुरू करण्याची तयारी दाखवून त्यासाठी प्रशासनाने सहकार्य करण्याची सूचना केली होती. त्यानुसार माजी खासदार नीलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी मालवण ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांची भेट घेऊन मालवणात कोविड सेंटर सुरू करण्यासाठी चर्चा केली. यावेळी कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या वसतिगृहामधील एका इमारतीत हे सेंटर सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. याबाबत जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा