*मंजूर कामांच्या टेंडर प्रक्रियेत अधिकाऱ्यांकडून दिरंगाई*
सिंधुदूर्ग ::
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध मंजूर असलेली विकास कामे सुरु करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज कणकवली सा. बा. विभागाच्या कार्यालयात भेट देऊन सा. बा. विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणा बद्दल अधीक्षक अभियंता छाया नाईक यांना फैलावर घेतले. तसेच मंजूर कामांची लवकरात लवकर टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना आ. वैभव नाईक यांनी दिल्या.
आमदार वैभव नाईक यांनी मंत्रालयात पाठपुरावा करून विविध रस्ते, पुल बांधकामासाठी विविध योजनांमधून निधी मंजूर करून आणला आहे. मात्र सा. बा. विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे वेळेत निविदा प्रक्रिया न झाल्याने कामे रखडली आहेत. तसेच अधिकाऱ्यांकडून वर्कऑर्डर वेळेवर दिली जात नाही, काम करणाऱ्या ठेकेदारांना अडचणी निर्माण केल्या जातात याबाबत नाराजी व्यक्त करत सा. बा. विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार वैभव नाईक यांनी खडेबोल सुनावले.
यावेळी सा. बा. विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, कणकवली कार्यकारी अभियंता संजय शेवाळे, सावंतवाडी कार्यकारी अभियंता श्रीकांत माने, उपअभियंता श्री. हिवाळे, उपअभियंता सौ. के.के.प्रभू, शाखा अभियंता पी.व्ही. कांबळी, श्री. बासुतकर, एन. पी. गाडे आदी उपस्थित होते.