भविष्यातील नैसर्गिक आपत्तीकडे पहात जिल्हाधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष द्यावे
*भाजपा युवा मोर्चा सोशल मीडिया सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजवीर पाटील यांची मागणी*
सिंधुदूर्ग :
कोणत्याही प्रभावी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडे भविष्यात येणाऱ्या संकटाचा सामना करण्याचे नियोजन हवे. मागील कित्येक वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणत्याही आपत्तीच्या प्रसंगात त्याचा सामना करू शकेल अशी यंत्रणा उभी राहिलेली नाही. आंबोलीत कड्यावरून पडलेल्या युवकांची शोधमोहिम असो किंवा अन्य कोणताही अपघात, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अगतिक झालेली दिसते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गिर्यारोहक संघटनेपासून आपत्ती व्यवस्थापनात कितीतरी युवक आणि संघटना काम करतात. परंतु जिल्हा आपत्ती निवारण यंत्रणेकडून कोणताही कायमस्वरूपी समन्वय त्यांच्याशी राखला जात नाही. मदतीसाठी परजिल्ह्यातील संस्थांना बिदागी देऊन पाचारण आणि जिल्ह्यातील युवकांना “गृहीत” धरून फुकट राबवणे हे आता कुठेतरी थांबवावे लागणार आहे. मागील काही वर्षातील खर्चाचे ऑडिट आम्हाला मागून त्याप्रमाणे वस्तुस्थिती पहावी लागेल, असा इशाराही राजवीर पाटील यांनी दिला आहे.
वादळानंतर दहा दहा दिवस जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीज पोहोचत नाही, पाण्यासाठी तळमळण्याची वेळ येणे, अन्नधान्य आणि निवाऱ्यावाचून जनता वंचित राहणे हे प्रशासनाचे यश नव्हे. आज वीज कामगार दाखल झाले, तर साहित्य नाही अशी अवस्था आहे. पाणी, अन्नधान्य, निवाऱ्यासाठी पत्रे, कौल यासाठी सामाजिक संस्था, राजकीय पक्ष धावून जात आहेत, हे चांगलेच उदाहरण आहे. पण यांच्या हवाले वतन करून आपत्ती निवारण व व्यवस्थापन यंत्रणा आणखी किती काळ सुशेगाद आणि रामभरोसे राहणार आहे? भविष्यात आणखीही नैसर्गिक संकटे येणार असल्याचा इशारा आधीच देण्यात आलेला आहे. अशा प्रसंगी आपत्ती निवारण यंत्रणेने योग्य आढावा घेतला तरच प्रशासनाला देखील मदत होणार आहे. अन्यथा मायबाप मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांचेही वऱ्हाड मालवणचा मासेखाऊ दौरा करते आणि त्यानंतरही रयत अन्न, पाणी, वीज व निवाऱ्याकरता तडफडते हेच चित्र कायमचे ठरेल. सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती निवारण यंत्रणेतली मरगळ व बेपर्वाही झटकून ही यंत्रणा सर्व मार्गांनी सक्षम करणे, स्वयंसेवी संस्थांचे त्याकामी योग्य सहकार्य घेणे आदी गोष्टी गरजेच्या आहेत, असेही पाटील यांनी म्हंटले आहे.