ॲम्ब्युलन्सचे दर सिंधुदुर्ग आरटीओने तात्काळ बंधनकारक करणे हाच कायमस्वरूपी उपाय.
:भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश सदस्य अविनाश पराडकर यांची मागणी
सिंधुदुर्ग जिल्हा कोविड-१९ अंतर्गत जिल्ह्यास रूग्णवाहिका सेवा देण्यास सिंधूदुर्ग प्रशासनाने शिफारस केलेल्या विशाल जाधव याचे वर्तन पूर्ण जिल्ह्याला लाज आणणारेच आहे. रुग्णाच्या नातेवाईकांना शिवराळ भाषेत बोलणे, भाड्यात अवास्तव लुबाडणूक करणे आणि शेवटपर्यंत मग्रुरीत वागणे हे सहन करण्यापलिकडचे आहे. विशाल जाधव याचा ॲब्युलन्स परवाना रद्द करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार नितेशजी राणे, जि. प.अध्यक्षा सौ संजना सावंत आदी भाजपा नेत्यांनी केली आहे आणि ती योग्यच आहे. अनेक रुग्णवाहिका चालक चांगली सेवा देत आहेत, हे मान्य करूनही दुर्दैवाने असे म्हणावे लागते की विशाल जाधव हा पहिला आणि शेवटचा असा ॲब्युलन्स चालक नाही. त्याच्या जातकुळीतील अन्यही काही भाऊबंद आहेतच, आणि ते त्याच्या संभाषणातूनही उघड झाले आहे. पेशंटचे अगतिक नातेवाईक न्याय मागण्याचे सक्षम पर्याय उपलब्ध नसण्यानेच लुटले जात आहेत. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांनी तातडीने यात लक्ष घालून पुणे जिल्ह्याच्या धर्तीवर दरपत्रक जाहीर करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे ही अत्यावश्यक जीवनसेवा असल्याने याबाबतच्या तक्रारी निवारण करण्यासाठी दोन्हींच्या समन्वयातून मदत-कक्ष स्थापन करण्याची गरज आहे. काही ॲब्युलन्स चालक-मालकांची मग्रुरी ही सत्ताधारी राजकीय नेत्यांच्या जीवावर वाढलेली असून ही वेळ दयामाया न दाखवता ही मग्रुरी मोडून काढण्याची आहे हे जिल्हाधिकारी व प्रशासनाने ध्यानात घेऊन पावले उचलावीत. आमदार नितेश राणे यांनी सांगितल्याप्रमाणे यातून जर लोकक्षोभ निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्याला प्रशासकीय यंत्रणेलाच जबाबदार धरावे लागेल. परंतु ती वेळ आजच्या स्थितीत प्रशासनाने येऊ देऊ नये, अशी विनंती भाजपा सोशल मीडियाचे अविनाश पराडकर यांनी केली आहे.
पुण्यामध्ये आरटीओने रुग्णवाहिकांसाठी सुधारित दरपत्रक जाहीर केले असून या दर पत्रकानुसार तीन प्रकारच्या रुग्णवाहींकांना ११ रुपये पासून १३ रुपये प्रति किलोमीटर भाडे आकारता येणार आहे. पहिल्या पंचवीस किलोमीटरसाठी अथवा दोन तासांसाठी ५०० ते ९०० रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. तसेच हे दरपत्रक रुग्णवाहिकेच्या आतील बाजूला दर्शनी भागात लावणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. जे रुग्णवाहिका चालक-मालक या ठरवून दिलेल्या भाडे दरापेक्षा जास्त आकारणी करतील अशा वाहनधारकांची तक्रार वाहन क्रमांकासह नोंद करण्याची व्यवस्था केली असून आरटीओच्या वायुवेग पथकाकडून कारवाई करण्यात येतआहे. वाहन प्रवास न करता उभे असल्यास प्रत्येक तासाकरता प्रतीक्षा दर लागू राहतील, असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे प्रस्तावित केलेल्या कमाल भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारता येणार नाही. प्रत्येक रुग्णवाहिकेला जीपीएस प्रणाली असणे आवश्यक आहे अशा प्रकारच्या रुग्णांना दिलासा देणाऱ्या अटी रुग्णवाहिका चालक मालक यांच्यावर बंधनकारक करण्यात आलेल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही तातडीने अशाप्रकारचे दरपत्रक निश्चित करून ते जाहीर करणे गरजेचे आहे. रुग्णवाहिका बद्दलच्या वाढत्या तक्रारी आणि जनतेतून धुमसणारे तक्रारींचे सुर पाहतात सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. विशाल जाधवसारखे लांछनास्पद कृत्य जिल्ह्याच्या इतिहासात दुसऱ्यांदा नको, असे परखड मत भाजपा सोशल मीडियाचे श्री. अविनाश पराडकर यांनी व्यक्त केले आहे.