You are currently viewing कणकवलीतील हायवेचे पथदीप दोन दिवसात सुरू करा, अन्यथा आमची स्टाइल दाखवावी लागेल…

कणकवलीतील हायवेचे पथदीप दोन दिवसात सुरू करा, अन्यथा आमची स्टाइल दाखवावी लागेल…

नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीला इशारा

शहरातील हायवेची प्रलंबित कामे मार्गी लागेपर्यंत ठेकेदार कंपनीला काम पूर्णत्वाचा दाखला देऊ नये

कणकवली :

कणकवली शहरातील गंगो मंदिर ते गडनदी पुलापर्यत चे अनेक पथदीप गेले काही महिने बंद आहेत. वारंवार हे पथदीप सुरू करण्याची मागणी करून देखील महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनी त्याकडे पुरते दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे दोन दिवसांत पथदीप सुरू न केल्यास आमची स्टाईल दाखवावी लागेल असा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ठेकेदार कंपनी व महामार्ग प्राधिकरणला दिला. व त्यानंतर रविवारी तात्काळ ठेकेदार कंपनी व महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी नगरपंचायत मध्ये दाखल होत दोन दिवसात पथदिव्यांची कामे मार्गी लावतो असे आश्वासन दिले. अनेकदा सूचना देऊनही जर कामे होत नसतील तर आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. पावसाळा तोंडावर आलेला असतानाच शहरातील महामार्ग चौपदरीकरणातर्गत पथदिवे बंद आहेत. यामुळे पावसाळ्यात शहरात महामार्गावर काळोखाचे वातावरण राहणार आहे. जर दोन दिवसात चौपदरीकरण अंतर्गत चे पथदीप सुरू न झाल्यास आमचा हिसका दाखवावा लागेल असाही इशारा नलावडे यांनी दिला. त्यानंतर महामार्ग प्राधिकरणचे उप अभियंता मनियार, शाखा अभियंता गणेश महाजन, ठेकेदार कंपनीचे अधिकारी आदींनी तात्काळ नगरपंचायत मध्ये धाव घेत नगराध्यक्षांची चर्चा केली. यावेळी नगरसेवक अभिजीत मुसळे, गटनेते संजय कामतेकर आदी उपस्थित होते. यापूर्वी अनेकदा सूचना देऊन झाल्या. तरी ही कामे मार्गी लागत नाहीत. दोन दिवसात हे काम सुरू न झाल्यास आमच्या स्टाईलने काम करून घेतले जाईल असा इशारा नगराध्यक्ष यांनी दिला. त्यावर येत्या दोन दिवसात शहरातील हायवे लगतचे पथदीप सुरू करण्याबाबत ठेकेदार कंपनी व महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा