You are currently viewing पुन्हा एकदा बापू….

पुन्हा एकदा बापू….

पुन्हा एकदा बापू….

सावंतवाडीत बऱ्याच वर्षांपूर्वी अचानक नगरपलिकेत परिवर्तन घडलं होतं, ऍड. दिलीप नार्वेकर यांची एकहाती असलेली सत्ता जाऊन नार्वेकर नगराध्यक्ष पदावरून पायउतार झाले होते, आणि त्या बदलाला कारणीभूत होते ते अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे सावंतवाडीतील प्रख्यात वकील बापू गव्हाणकर….!
सावंतवाडीत २३ वर्षानंतर पुन्हा एकदा सत्ता बदल होऊन दीपक केसरकर यांची सावंतवाडीवर एकहाती असलेली सत्ता जाऊन भाजपची सत्ता आली. संजू परब हे नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आणि नगरपालिका भाजपच्या अंमलात आली. संजू परब हे माजी खासदार डॉ.निलेश राणे यांचे शिलेदार. परंतु सावंतवाडी न.पा. पोटनिवडणुकीत आम. नितेश राणे यांनी सर्व धुरा आपल्या हातात घेऊन सत्ता खेचून आणली होती, त्यात आम.रवींद्र चव्हाण यांचाही वाटा होता. परंतु गेल्या काही दिवसात संजू परब हे राणे कुटुंबापासून दुरावत रवींद्र चव्हाण यांच्या जवळ गेले आणि तिथूनच सावंतवाडीत बरेचसे वादग्रस्त निर्णय व्हायला लागले.
सावंतवाडी संत गाडगेबाबा भाजी मंडईतील अतिक्रमण हटवून तेथील व्यापाऱ्यांना मार्केटमध्ये जागा दिली गेली. गवळी तिठा परिसरातील गाडे, टपरी हटाव सारखे निर्णय घेतले गेले. नगरपलिकेत सत्तेच्या जोरावर आणि विरोधकांनी केलेल्या आरोपानुसार भाजी मार्केटच्या जागी मॉल बांधून तिथे सर्व नगरसेवकांना गाळा देण्याचे आमिष दाखविण्यात आले. असे बरेचसे निर्णय संजू परब यांनी घेतले. त्यामुळे भाजीपाला विक्रेते, स्टॉल, टपरीवाले अडचणीत आले, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला. गावागावात पिकवलेली भाजी सावंतवाडीत आणून विकून त्यावर आपलं घरदार चालवणारी गोरगरीब माणसे अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकत नव्हती. तर काही आमिष दाखविल्यामुळे मूग गिळून गप्प होती.
सावंतवाडीतील प्रख्यात वकील बापू गव्हाणकर हे नेहमीच अन्यायाविरुद्ध पेटून उठतात. ९० च्या दशकात सावंतवाडीत घडलेल्या वासनाकांडच्या विषयात बापुनी नगरपलिकेवर मोर्चा काढला होता, सावंतवाडीतील कित्येक लोक त्यात सहभागी झाले होते. त्यावेळी सावंतवाडी नगरपलिकेतील तत्कालीन नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर यांना नगराध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर गेल्यावर्षी झालेल्या सावंतवाडी नगरपलिकेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत तर मागच्या घटनेला अनेक वर्षे उलटूनही नार्वेकर यांचे डिपॉझिट सुद्धा वाचू शकले नव्हते. तेव्हाही अन्याय झाला होता, सावंतवाडीकर सावंतवाडीच्या सुपुत्राच्या विरोधात पेटून उठले होते, आणि आता तर संजू परब हे मडुऱ्याचे रहिवासी. संजू परब यांच्याकडून सावंतवाडीवासीय व्यापारी, भाजीपाला विक्रेते, स्टॉल, टपरिवाले यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पुन्हा एकदा बापू गव्हाणकर पेटून उठले आहेत. आणि जेव्हा बापू पेटून उठतात तेव्हाचा इतिहास हा सावंतवाडीकर जनताच बदलून दाखवते. सावंतवाडी शहरात सुरू असलेली अंधाधुंदी, दादागिरी, हम करे सो कायदा जास्त दिवस टिकत नाही, त्याला सावंतवाडीकर जनताच हाणून पाडते याचा प्रत्यय यापूर्वी सुद्धा आलेला आहेच, आणि भविष्यातही येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुन्हा एकदा बापू* हे एकच वाक्य भविष्यातील बदलाची नांदी बनू शकते यात शंकाच नाही…!!

प्रतिक्रिया व्यक्त करा