You are currently viewing आमदार साहेब हे वागणं बरं नव्हं; आ.नाईक यांना अमित इब्रामपूरकर यांची कोपरखळी…

आमदार साहेब हे वागणं बरं नव्हं; आ.नाईक यांना अमित इब्रामपूरकर यांची कोपरखळी…

आ.नाईक यांचा ताडपत्री विक्रीचा नवा धंदा; इब्रामपूरकर यांचा आरोप…

मालवण :

आठ दिवसापूर्वी तौक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मालवण तालुक्यात तर नुकसानीचा आकडा कोट्यावधी रुपयाचा आहे. लोकांच्या घरादारावर झाडे पडल्याने लोकांची दयनीय अवस्था झाली आहे. एकतर कोरोनाने सर्वसामान्यांची रोजीरोटी हिरावून घेतली आहे. अश्यावेळी वादळाने केलेले नुकसान पाहून लोकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नेमकी हीच संधी साधून आणि कोरोना काळात पावसाळी साहित्याची विक्री करणाऱ्या दुकानांवर असलेले शासनाने घातलेले वेळेचे बंधन याचा पुरेपूर फायदा उठवीत शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी मालवणच्या शिवसेना शाखेत ताडपत्री विक्रीचा नवा धंदा शोधून काढला आहे. अशी टीका म.न.वि.से माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी करून आमदारांची ही कृती म्हणजे प्रेताच्या ताळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार असल्याचा घणाघातही त्यांनी केला आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे की, सध्या आमदार वैभव नाईक हे चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या भागाची पाहणी करीत असून शासनाकडून लवकरच नुकसान भरपाई दिली जाईल असे आश्वासनही देत आहेत. वस्तुतः गेल्या वर्षीच्या निसर्ग वादळाची नुकसान भरपाई अद्याप वादळग्रस्ताना मिळाली नाही. मच्छिमारांची आपल्याला कणव आहे असे भासवणाऱ्या वैभव नाईक यांनी नुकसान भरपाईसाठी लागणाऱ्या कागदपत्रासाठी मत्स्य व्यवसाय खाते मच्छिमारांना कसे छळते त्याची विचारणा करावी. आतातर चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची पाहणी करताना आमदार वैभव नाईक हे स्वतःच्या गाडीमध्ये नुकसानग्रस्ताना विकण्यासाठी ताडपत्र्यांची बंडले घेऊन फिरत आहेत त्याचप्रमाणे मालवणच्या शिवसेना शाखेतही भगव्या रंगाच्या ताडपत्र्या विकल्या जात आहेत. या ताडपत्र्या सहाशे रुपयाला विकल्या जात आहेत ज्यावेळी एखादा गरजू व्यक्ती ताडपत्री घेण्यासाठी शिवसेना शाखा गाठतो व तिथे उपस्थित असलेल्यांकडे ताडपत्रीची याचना करतो तेव्हा त्याच्याकडे सहाशे रुपये मागितले जातात ही गोष्ट सर्वश्रुत आहे. गेल्यावेळी पावसाळ्यातही आमदारांनी पाचशे रुपयाला एक ताडपत्री अश्या पद्धतीने ताडपत्रीची विक्री केली होती. या वर्षी तीच ताडपत्री सहाशे रुपयांना विकून गरिबांच्या पैशाची लूट करीत असल्याचा आरोप श्री. इब्रामपूरकर यांनी करून आमदार साहेब हे वागण बर नव्हं असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा