अपेक्षेप्रमाणे कोकणाला नुकसानभरपाई निश्चित मिळेल – मुख्यमंत्री
मालवण:
सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. संबंधित विभागाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असून येत्या दोन दिवसात नुकसानभरपाई घोषित केली जाईल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मालवण येथे दिली. यावेळी पत्रकारांनी पंतप्रधान मोदी यांनी केलेला गुजरात दौरा आणि जाहीर केलेली मदत यावर छेडले असता मी या परिस्थितीत राजकारण करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही सहकार्य मिळत असून मी टीका करायला विरोधी पक्षनेता नसल्याचा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यातील चिवला बिच आणि किनारपट्टी भागातील पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खा.विनायक राऊत, आ.वैभव नाईक, आ.दीपक केसरकर आदी उपस्थित होते. शिवसेना कोकण वासीयांच्या पाठीशी संकटात कायम सोबत आहे आणि यावेळीही असेल कोकणासाठी निश्चित अपेक्षित नुकसानभरपाई घोषित केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.