सावंतवाडी वन विभाग व माउंटेनिअरिंग असोसिएशनचा पुढाकार.
वैभववाडी
२२ मे या आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या निमित्ताने सावंतवाडी वन विभाग आयोजितआणि माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टच्या पुढाकाराने जिल्ह्यातील समविचारी संस्थांच्या सहकार्याने देवराईमध्ये बीजारोपनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक मा.एस.डी.नारनवर व असोसिएशनचे अध्यक्ष श्री.प्रकाश भाऊ नारकर यांनी दिली.
पृथ्वीवरील जैवविविधता ही थक्क करणारी आहे. तिच्या योग्य माहितीचा प्रसार झाल्यास संरक्षण करण्याबाबतही जागृती करता येईल. या विचाराने २२ मे हा आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस सन २००० च्या आधीपासून साजरा केला जातो. सन २०१५ ते २०३० या काळातील विकासाची संभाव्य दिशा लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने (UNO) शाश्वत विकासासाठी जैवविविधता संकल्पना ठरवली आहे.
जैवविविधतेच्या संवर्धनासाठी भारत सरकारने २००२ मध्ये तर महाराष्ट्रात २००८ पासून जैवविविधता नियम लागू आहेत. यामध्ये रहिवाशांनी आपल्या परिसरातील जैवविविधता नोंदवही बनविण्याची संकल्पना आहे. सरकारी तसेच संस्थात्मक पातळीवर या दिवसानिमित्त अनेक उपक्रम राबवले जातात. यामध्ये वैयक्तिक पातळीवर आदिवास जपणे, प्रदूषण टाळणे, वृक्षारोपण करणे, शाश्वत विकासासाठी शेतीच्या पद्धती अवलंबणे इत्यादी.
कोकण आणि त्यामध्ये सिंधुदुर्ग म्हणजे जैवविविधतेचा खजिनाच आहे. परंतु विकासाच्या नावाखाली दिवसेंदिवस ही जैवविविधता नष्ट होत चालली आहे. देवराई हे कोकणचे खास वैशिष्ट्य असून त्याविषयी लोक माणसांमध्ये विशेष श्रद्धाभाव आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक देवरायांची संख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून ती १३०० पेक्षा जास्त आहे. या देवराईंचे संवर्धन आणि वाढ होण्याच्या दृष्टीने २२ मे या आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या निमित्ताने सावंतवाडी वन विभाग आणि माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक या संस्थेच्या पुढाकाराने इतर समविचारी संस्थां व व्यक्तींच्या सहकार्याने कोकणातील देवराईंमध्ये बीजारोपन करण्याचे ठरविले आहे. बीजारोपनासाठी लागणारी बीजे वनविभाग पुरविणार असून जवळच्या वन विभागाशी संपर्क साधावा. यासाठी गावचे सरपंच, देवस्थानच्या कमिटीचे अध्यक्ष, वनविभाग व काही संस्था यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी करायचा आहे.
यामध्ये सिंधुदुर्ग ॲडव्हेंचरचे डॉ.कमलेश चव्हाण, शिवप्रेमी सिंधुदुर्गचे श्री.रमाकांत नाईक, जनसेवा प्रतिष्ठानचे डॉ.संजीव लिंगवत, स्वराज्यकार्य टीमचे श्री. आशिष राऊळ, दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे श्री.गणेश नाईक, अरण्यमित्रचे डॉ.बापू भोगटे, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन महासंघाचे श्री.बाबा मोंडकर, रांगणा रनरचे डॉ.प्रशांत मढव, समानवता ट्रस्टचे श्री.कमलेश गोसावी, स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघाचे श्री.संदीप राणे व कोकण इतिहास परिषद सिंधुदुर्ग शाखेचे पदाधिकारी सक्रिय सहभागी होणार आहेत. या विधायक आणि राष्ट्रीय कार्यक्रमात जिल्ह्यातील निसर्गप्रेमी, दुर्गप्रेमी व पर्यावरणप्रेमी यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून सहभागी व्हावे असे आवाहन सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक मा.एस.डी.नारनवर, माउंटेनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष श्री.प्रकाश भाऊ नारकर, उपाध्यक्ष डॉ.कमलेश चव्हाण, सचिव प्रा.श्री.एस.एन. पाटील व सदस्य डॉ.गणेश मर्गज यांनी केले आहे.