सिंधुदुर्ग :
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळामुळे झाडांची पडझड होऊन अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना तातडीने छप्परासाठी ६ गाड्या भरून सिमेंट पत्रे पाठविले आहेत. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांतून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात हि मदत पोहचली असून आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ, कणकवली, सावंतवाडी मतदारसंघात ह्या गाड्या मार्गस्थ केल्या आहेत.
यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, शिवसेना नेहमीच संकट काळात नागरिकांना मदतकार्य करत असते. त्यानुसार शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्तांसाठी ६ गाड्या भरून सिमेंट पत्रे पाठविले आहेत. वादळामुळे नुकसान झालेल्या सिंधुदुर्ग वासियांना जास्तीत जास्त मदत देण्याचे काम येत्या काळात शिवसेनेच्या माध्यमातून केले जाणार आहे.असे आ. वैभव नाईक यांनी सांगत ना. एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
ना.एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेले पत्रे नुकसान झालेल्या सर्वांना दिले जाणार आहेत. संकटकाळी सर्वप्रथम शिवसेना पक्षच धावून येत असतो. या संकटातहि हे सिद्ध झाले आहे. अशाच प्रकारे शिवसेना जनतेच्या संकटकाळात मदतकार्यासाठी तत्पर राहील असे संदेश पारकर यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, नगरसेवक सुशांत नाईक,युवासेना जिल्हा समन्वयक राजू राठोड,जोगी राणे, अरुण परब आदी उपस्थित होते.