खोरीतील नुकसानग्रस्त नागरिकांमध्ये नाराजी
वैभववाडी–
तौक्ते चक्रीवादळात सर्वात जास्त नुकसान वैभववाडी तालुक्यातील खोरीमधील गावांचे झाले आहे. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत केवळ नाधवडे गावाला भेट देत दौरा अर्धवट सोडून गेले. यामुळे पालकमंत्र्यांच्या दौऱ्याकडे डोळे लावून बसलेल्या नुकसानग्रस्त नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे. पालकमंत्री श्री. सामंत यांचे वैभववाडी तालुक्यावरील प्रेम बेगडी असल्याची टीका वैभववाडी माजी उपसभापती दिगंबर उर्फ बंड्या मांजरेकर यांनी प्रसिद्धी पत्रकातुन केली आहे.
तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पालकमंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा जाहीर झाला. वैभववाडी तालुक्यात ते नाधवडे, सांगुळवाडी, सडुरे व कुर्ली गावांना भेट देऊन पाहणी करणार होते. मात्र त्यांनी नाधवडेतूनच काढता पाय घेतला. संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना नाधवडे येथे बोलवून त्यांनी आढाव्याचा सोपस्कार पूर्ण केला. अशी टीका श्री मांजरेकर यांनी केली आहे.
खोरीतील सांगुळवाडी, अरुळे, नावळे, सडुरे व शिराळे या गावांचे चक्रीवादळात मोठे नुकसान झाले आहे. पालकमंत्री दौऱ्यावर येणार म्हटल्यावर नुकसानग्रस्त नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र पालकमंत्री दौरा अर्धवट सोडून गेल्याने त्या नागरिकांची घोर निराशा झाली आहे. पालकमंत्री यांचे तालुक्यावर मनापासून प्रेम नसल्याची टीका बंड्या मांजरेकर यांनी केली आहे.