You are currently viewing तोउत्के दुर्दशा आणि दिशा

तोउत्के दुर्दशा आणि दिशा

परवाच्या तोउत्के नावाच्या चक्रीवादळाने तळ कोकणची पार दुर्दशा करून टाकली. अंदाजे साठ वर्षापूर्वी म्हणजे १९६१ सालच्या वादळाने अश्या पद्धतीची आपत्ती कोकणावर ओढवली होती. पण ती आमच्या पिढीच्या जन्मापूर्वी. पण त्याची आता २०२१ साली तोउत्के ने व्याजासकट पूनार्वृत्ती केली. मध्ये एक पिढी संपली व दोन पिढ्या जन्माला आल्या. पण ताशी शंभर किलो मिटर पेक्षा जास्त वाऱ्याचा वेग घेवून अरबी समुद्र किनाऱ्या पासून हाकेचा अंतरावर असलेल्या या चक्री वादळाने निसर्ग संपन्न कोकण च्या ५० कीलों मीटर चिंचोळ्या पट्ट्याला आडकित्याने दाढेत सुपारी चा भुगा करावा तसा ६/७ तास चेचून कोंकण वासियांच्या स्वप्नांचा चुराडा केला. गोव्यासकट तेरेखोल पासून विजयदुर्ग च्या किनाऱ्याला लागून ३० /३५ किलोमीरवरील गावातील घरांचे, झाडांचे सैतानी वाऱ्याने दिवसा ढवळ्या सगळ्यांच्या डोळ्यादेखत लक्ते तोडले. उधाणाच्या पाण्यामुळे समुद्राचे पाणी जिथे जिथे शक्य असेल तिथे नदीतून ८/१० किलोमिटर आत शिरून भात शेतीसह बागायती वर खाऱ्या पाण्याने नापीकतेची सारवणुक केली. पुढील कमीत कमी २० वर्षे म्हणजे आमची मुले बाळे खपली तरी ही जमीन आता सुपीक होणे नाही.
समुद्राच्या खारट आणि मातकट वरवंटा सुपीक जमिनीवर चालू असतानाच अस्मानी रगेल तोक्ते वादळ बेशिस्तीने घरांचे पत्रे, गुरांचे गोठे, शेती पंपाचे शेड आणि गवताचे मांगर व त्यांची छप्परे आकाशात भिरकावून देत होते. जे उडत न्हवते त्यांची कौ ले व कोणे पावलीत पडून फुटत होते. लाईटचे खांब(पोल ) व तारा पहिल्या फटक्यात अधांतरी लोंबत होत्या. आधीच कोरोना मुळे ऑक्सिजन वर असलेल्यां मुळे नातेवाईकांचे जीव या अस्मानी सुलतानी मुळे टांगणीला लागले होते. समुद्राच्या बाजूचे मच्चीमारांची वसाहत व जाळी डोळ्यादेखत समुद्रात वाहून जात होती. किनाऱ्यावर आणून ठेवलेल्या बोटी एकमेकावर आदळत होत्या. मृत्यू समोर दिसत असूनही जीव जात नव्हता एवढेच.
आंब्याच्या बागेतील पाडाचे आंबे जमिनीवर उपेक्षित पडले होते. सुपारीच्या बागा, पोफळीची झाडे जमिनीवर आली होती. कवाथे आणि धरते माड अर्ध्यावरच मोडून पडले होते. केळीच्या बागा पूर्ण भुई सपाट झाल्या होत्या. हुकुमी पैसा म्हणून प्रसिद्ध कोकम आणि सोललेली फळे पावसाच्या पाण्यात भिजून वाहून गेली. सागवान आडवे झाले.

गेल्या वर्षीचा आंब्याचा बाजार कोरोना टाळेबंदी मुळे पूर्ण उठला होता. यंदा सुरुवातीला मोहोर नव्हता पण डिसेंबर नंतर मोहोर दिसायला लागला पण फेब्रुवारी मार्च च्या अवेळी पावसाने आंबा व काजू चे बरेचसे नुकसान झाले होते. पीक निम्म्यावर आले तर परत टाळेबंदी लागली. उरलेलं पीक कालच्या चक्रीवादळाने जमीनदोस्त केलं. शेतकऱ्यांसह व्यापारीही सलग दुसऱ्या वर्षी कंबरड्यातून मोडला. घायकुतीला आला. संपला.
आजची, आताची परिस्थिती म्हणजे लाईट गेली ती अजूनही पत्ता नाही. नेटवर्क तुटलं. बोलणं खुंटल. शेतीत नागरून तरवा उपावा तर खारे पाणी, पंप बंद पडले. आंबे संपले. नारळ पोफळी मोडून पडले. काजु,कोकम, जांभूळ कुजले. कोकणी माणसाने जगावं कसं बघावं कोणाकडे?. गेल्या तीन वर्षांपासून दरवर्षी येणारे तिसरं वादळ. कारण काहीही असो ..! ग्लोबल वॉर्मिग का माणसाने केलेले निसर्गावर अतिक्रमण? आता पुढची दिशा शोधावी लागेल. ती कोकणी माणसाला.
कोकणी माणूस मोडेन पण वाकणार नाही. हा ताठरपणा निसर्गातून आलेला. पण आता मोडायला पैसा आणि वाकायला कणा शिल्लक राहिला नाही. कोकण दोन पिढ्या आणि किमान २५ ते ३० वर्षे मागे गेलं. असं म्हणतात मुंबई नेहमी जागी आणि उठून चालणारी. कधी थांबली नाही हे सत्य असेल तर ती फक्त आणि फक्त कोकणी माणसा पासूनचं. कोकणातील घरटी कमीत कमी एक माणूस आज मुंबईत आहे. काही घर व खानदाने आज ५/७ पिढ्या मुंबईत आहेत. कुठल्याही प्रसंगाला धीराने तोंड देण्यासाठी आज कोकणी माणूस मुंबईत सर्वात प्रथम चाळीतून रस्त्यावर येतो. पुढाऱ्यांच्या हाताला बळ देतो. सर्वच राजकीय पक्षांनी कोकणी माणसाच्या या बेदरकार वृत्तीचा आणि नैसर्गिक ताठरतेचा आपल्यासाठी चांगला उपयोग करून घेतला. संपूर्ण कोकणच्या ५ जिल्ह्यातून डझनभर आमदार आणि अर्धा डझन खासदार असणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेने आता या चक्रीवादळात कोकणी माणसाच्या पैसा, शेती आणि बागायतीचा चुराडा झालेल्या परिस्थितीत ठोसपणे उभे राहून मदत करणे अपरिहार्य आहे. इतर पक्षांनी अंतर्गत हेवेदावे विसरून आजच्या परिस्थितीत कोकणी माणसाला सन्मानाने उभे करायला मदत करायला हवी. शासनाची आर्थिक मदत ही तुटपुंजी आहे. डोकं झाकाल तर पाय उघडे पडणार, म्हणूनच कोकण बद्दल शास्वत अश्या पर्यटन वाढीचा दृष्टिकोनातून ठोस बदल व कायमस्वरूपी दिशा ठरवणे ज्यास्त सयुक्तिक ठरणार आहे. गेल्या दहा वर्षाचा विचार केल्यास भात शेती अर्धी अधिक पड व निसर्गाच्या मर्जीत संपून गेली. फळबागा वादळात कोलमडून पडल्या. राजकारणात कुरघोडीच्या लकवा मारल्यामुळे कोकणचे औद्योगिक धोरण रुग्ण शय्येवर आहे. अश्या परिस्थतीत कोकणी माणसाला ताठ मानेने जगायला फक्त पर्यटन क्षेत्र खुल आहे. पण लाल फितीच्या कारभारामुळे पर्यटन विकासाच्या मानेला फास बसला आहे. सिंधुदूर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून प्रसिद्ध असला व शासकीय स्थरावर घोषित झाला असला तरीही अजूनही पर्यटन सुविधा गोगल गाईच्या गतीने चालत आहेत. कोकणचा कॅलिफॉर्निया करतानाची चिमणीच्या लग्नाला आहेर म्हणून मिळणारी मदत आज मुलीच्या बारश्या पर्यंत कागदावर मर्यादित आहे. म्हणूनच परवाच्या तोउत्के चक्री वादळाने दुर्दशा केल्यामुळे आज सिंधुदुर्गसाठी सर्व समावेशक असे आश्वासक पर्यटन धोरण भूमी पुत्राला नक्कीच जगण्याची नवी दिशा दाखवेल.

डॉ. अजित ठाकुर.

प्रतिक्रिया व्यक्त करा