वाळू माफिया ड्रायव्हरला करतात नफ्यात भागीदार.
संपादकीय…..
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाळूचा व्यवसाय मोठ्या तेजीत सुरू असतो. वाळूचा लिलाव होवो अथवा न होवो जिल्ह्यात वाळू मोठ्या प्रमाणावर काढली जाते. कर्ली नदीच्या पत्रातून काढलेल्या वाळूवरच जिल्ह्यातील बांधकाम अवलंबून असते, परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळत असलेली वाळू चांगल्या दर्जाची असल्याने गोव्यात वाळूला मोठी मागणी असते आणि वाटेल तो दर गोव्यात मिळतो. त्यामुळे वाळूचे मोठे व्यापारी सावंतवाडी तालुक्यातील गोव्याच्या जवळच्या गावातील ड्राइवरना आपल्या गाडीवर ठेवत त्यांना हाताशी धरत ड्राइवर च्या गावातच चोरट्या वाळूचा मोठा साठा केला जातो.
वाळूचा साठा करावयाची जागा ही बिनशेती असणे आवश्यक असताना सरकारची लाखो रुपयांची रॉयल्टी बुडवून चोरटी वाहतूक केलेली ही वाळू कित्येक गावांमध्ये ७०/८० ट्रिप होईल एवढ्या मोठ्या प्रमाणावर साठा करतात, म्हणजे जवळपास २००/३०० ब्रास वाळू साठा केल्यावर २ लाखांच्यावर शासनाची रॉयल्टी बुडवली जात आहे. बांधकामास गरज असेल व पावसाळ्यात वाळू उपलब्ध नसेल त्यावेळी अशी साठा केलेली वाळू गोवा, सिंधुदुर्गात चढ्या दराने विक्री करून बक्कळ पैसा कमावला जात आहे. मुळात वाळू वाहतुकीसाठी पास नसताना अशी चोरटी वाळू वाहतूक होतेच कशी?
शासनाने वाळूचा लिलाव केला नसताना महसुलच्या अधिकाऱ्यांच्या कृपेने हा चोरटा वाळू व्यवसाय सुरूच असतो. वाळूचा लिलाव होत नाही तो महसुलच्या अधिकाऱ्यांना फायद्याच्याच असतो. कधीतरी एखादी कारवाई दाखवून महिनाभर वाळू माफियांकडून हफ्ते गोळा करता येतात. त्यामुळे वाळूच्या चोरट्या वाहतूक आणि साठयास महसूल अधिकाऱ्यांकडून अभय दिले जाते.
सावंतवाडी तालुक्यातील निरवडे मळेवाड मार्गावरील दोन्ही बाजूने राज्य मार्ग जात असलेल्या एका गावात कुडाळ येथील वाळू माफियाने त्याच्या डंपर वर ड्राइवर असणाऱ्या त्याच गावातील व्यक्तीला “तू माझा बिझनेस पार्टनर” असे सांगत बिना परवाना जवळपास ७० ट्रिप म्हणजे २१० ब्रास वाळूचा साठा बिनशेती नसलेल्या जागेत केला आहे. एक ट्रिप वाळू सर्वसामान्य माणसाने घेतली तर त्याच्यावर कारवाई करणारे महसूल अधिकारी ७० ट्रिप वाळूचा बेकायदेशीर साठा होत असताना झोपेत होते की काय? की मुद्दामहून डोळेझाक करत होते? असा प्रश्न गावातील लोकांनाच पडला आहे. अशाचप्रकारे महसुलच्या आशीर्वादाने जिल्ह्यातील अजून किती गावात वाळूचा साठा केलेला असेल आणि किती करोड रुपयांना शासनाला चुना लावला असेल हा मोठा प्रश्न आहे.