विशेष संपादकीय…..
वादळ येणार…. जिल्हा प्रशासनाने आठ दिवस अगोदरच येणाऱ्या वादळाची कल्पना जिल्हावासीयांना दिलेलीच होती, किनारपट्टी वरील कोकणी बांधवांना स्तलांतरीत होणाऱ्या सूचना दिल्या गेल्या, किनाऱ्यावर जाण्यास प्रतिबंध केला होता, शक्य ती सर्व जय्यत तयारी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने केली होती. वादळात जीवितहानी होणार नाही याची देखील दक्षता घेण्यात आली होती. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे त्यासाठी खरोखरच अभिनंदन. जिल्ह्यात यापूर्वीही वादळे आली, किनारपट्टी वर गोंधळ घालून निघून गेली होती. तशाच प्रकारे तौक्ते वादळ देखील येईल, थोडाफार वारा असेल आणि निघून जाईल याच विश्वासावर जिल्हावासीय राहिले, परंतु प्रशासनाने दिलेली सूचना जास्त गांभीर्याने घेण्याची गरज होती असे वादळ सुरू झाल्यावर वाटू लागले.
प्रशासनाने किनारपट्टीवर ५०-६० च्या वेगात वारे वाहतील असा वर्तविलेला अंदाज फोल ठरला आणि तिथेच वादळाने संपूर्ण किनारपट्टीसाहित आजूबाजूच्या गाव शहरांना अक्षरशः दिवस रात्र जीव मुठीत धरून जगण्यास भाग पाडले. जिल्ह्यात साडे चारशेपेक्षा जास्त घरांचे झालेले नुकसान हेच वादळाची भयानकता दाखवून देते. शेवटचा हंगामी आंबा आणि काजूच्या तर राशींवर राशी बागांमध्ये पडल्या, हजारो आंबा, काजू, नारळ,फोफळींची दरवर्षी हमखास उत्पन्न देणारी झाडे जमीनदोस्त झाली. झाडांच्या खाली पडलेले आंबे, काजू आणि लोकांच्या घरांची उडून गेलेली छप्परे, मोठमोठे वृक्ष, माड पडून कोसळलेली घरेच्या घरे पाहून मन हेलावून सोडले, डोळ्यांतून अश्रुंचे पाट वाहू लागले.
एक दोन तास वाहणारा वारा आणि झाडांना गोलाकार फिरवून कुठेतरी किरकोळ नुकसान झालेली वादळे येतंच असतात, परंतु तौक्ते वादळ मात्र या सर्वांना अपवाद ठरवून संपूर्ण किनारपट्टीवर नंगा नाच करत किनारपट्टीसाहित जिल्ह्याला हादरवून गेले. वादळ गुजरातमध्ये पोचल्यावरही त्याचा मागोवा घेणारा वारा पाऊस माणसांच्या मनात धडकी भरवत होता. कोरोनाचे संकट जिल्ह्यावर कायम असताना, त्यातून सावरण्याची ताकद देखील लोकांच्या अंगात नसताना तौक्ते वादळाने एका दिवसात जिल्ह्यात हाहाकार माजवला आणि कित्येकांना बेघर करून टाकले. कोकणातील तौक्ते वादळाचे रौद्र रूप कोणत्याही चॅनेलवर प्रभावीपणे दाखवले गेले नाही, आणि जिल्ह्यात विजेचे खांब पडल्याने वीज नसल्यामुळे सोशल मीडियावर देखील वादळाची भयानकता दिसून आली नाही. परंतु वादळ शांत झाल्यावर मात्र त्याची भयानकता व्हायरल झालेल्या छायाचित्रांतून सर्वांसमोर येत आहे. जिल्ह्यातील शहरांमध्ये सलग दोन दिवस वीज पुरवठा खंडित झाला होता यावरूनच वादळाने काय परिस्थिती जिल्ह्यावर आणली असेल याचा प्रत्यय येतोच आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री जास्तीतजास्त मदत मिळवून देणार म्हणताहेत, परंतु घर पडल्यानंतर ते उभे करण्यासाठी या महागाईच्या दिवसात जिथे लाखो रुपये लागतात तिथे सरकारची तुटपुंजी महिनाभर राशन सुद्धा न भागवणारी आणि कधी पंचनामे होतील त्यानंतर पदरात पडणारी ५००० रुपयांची मदत कोणाला पुरणार आहे? वादळ राज्याबाहेर गेल्यावरही कोकणासाठी वरिष्ठ पातळीवरून मदत कधी जाहीर होणार? शेकडो घरे पडलीत, कोरोनाच्या महामारीत त्यांचे पंचनामे कधी होणार? असे अनेक प्रश्न जिल्हावासीयांसमोर आ वासून उभे आहेत.
तौक्ते वादळाने कोकणात हाहाकार उडवला, लोकांच्या अंगात भीतीने थरकाप उडाला, १६ तास किनारपट्टीवरील कोकणकर बांधवांना जीव मुठीत धरून जगण्यास भाग पाडले. ज्या बागांनी,आंबा,काजू,फणस, माड, फोफळींच्या जीवावर कोकणकर बांधव अगदी अस्मानी संकटात देखील सरकारपुढे हात पसरत नाही, त्याच कल्पवृक्षांना डोळ्यासमोर धारातीर्थी पडताना पाहणे लोकांच्या नशिबी आले. कोकणी बांधव कणखर आहेत, कोणाच्या मदतीवर अवलंबून राहत नाहीत, परंतु जेव्हा जीवावर बेतते तेव्हा मात्र मग तो कोकणी असो व देशस्थ पार कोलमडून जातो. आज कोकणी बांधव असाच पार कोलमडून पडला आहे. सरकारकडून किती मदत मिळेल न मिळेल, कोकणी माणूस खंबीरपणे स्वतःचे घर पुन्हा उभं करण्यासाठी जीवाचा आटापिटा करणार, आपलं घरकुल उभारणार…. पण कधीतरी सरकार कोकणाकडे आपली नजर वळवणार का? मदतीचा एक हात कोकणाला देणार का? हे प्रश्न मात्र अनुत्तरित राहणार की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकार कोकणावर मेहेरनजर होणार….. हे येत्या काही दिवसांत दिसून येईलच….
वादळ गेलं….परंतु तब्बल १६ तास घोंगावणारा वादळाचा आवाज अजूनही कानात गुंजतो आहे. हा वादळाचा आवाजच कोकणी बांधवास पुन्हा खंबीरपणे उभे राहण्याची स्फूर्ती देईल.